स्काऊट गाईडचे नव निर्वाचित राज्य आयुक्त संतोष मानूरकर यांचा यथोचित सत्कार
बीड(प्रतिनिधी)-संतोष मानूरकर यांनी आपल्या पत्रकारीतेचा विधायक वापर हा स्काऊट गाईड चळवळीच्या उभारणीसाठी लावला. हा आदर्श स्काऊट गाईड चळवळीला राज्यासाठी उभा राहिला. त्यामुळेच स्काऊट गाईडचे मुख्य राज्य आयुक्त भा.ई.नगराळे यांनी हा बीड पॅटर्न राज्यात संतोषरावांनी राबवावा आणि स्काऊट गाईडला लोकचळवळीचे स्वरुप द्यावे या व्यापक दृष्टीकोणातून त्यांची राज्य आयुक्त पदी निवड केली आहे. हेच बीडच्या पत्रकारीतेचे खरे यश म्हणावे लागेल. संतोषरावांनी पत्रकारीता करताना शत्रू नव्हे तर मित्र गोळा केले म्हणुनच ते पत्रकारीतेतील अजातशत्रू म्हणून ओळखले जातात. त्यांच्या जोडीला वसंत मुंडेंसारखा दिलदार पत्रकार खंबीरपणे उभा राहिला. आता ही जोडी राज्यात स्काऊट गाईड चळवळीमध्ये बीडचे नाव उज्ज्वल करेल असा विश्वास ज्येष्ठ संपादक गंमत भंडारी यांनी व्यक्त केला.
बीड जिल्हा पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष तथा बीड जिल्हा स्काऊट गाईडचे आयुक्त संतोष मानूरकर यांची स्काऊट गाईडच्या राज्य आयुक्तपदी निवड झाल्याबद्दल पत्रकार आणि पत्रकार स्नेहींच्या वतीने बीड जिल्हा स्काऊट गाईड भवन येथे दि. 13 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता कौटुंबिक सत्कार सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ संपादक गंमतभाऊ भंडारी यांची उपस्थिती लाभली. यावेळी व्यासपीठावर पत्रकार संघाचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा शासनाच्या विभागीय पत्रकार अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष वसंत मुंडे यांच्यासह श्रमिक पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष महेश वाघमारे, पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुभाष चौरे, पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष वैभव स्वामी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन मुळूक, संपादक राजेंद्र होळकर, ज्येष्ठ पत्रकार गुलदाद पठाण, स्काऊट गाईडचे धनंजय शिंदे, शिवसंग्रामचे सुहास पाटील आदिंची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलतांना ज्येष्ठ संपादक गंमत भंडारी म्हणाले, स्काऊट गाईडचे जिल्हा आयुक्तपद म्हणजे लाभाचे पद असावे असं आम्हाला सुरुवातीला वाटले होते. परंतु हे पद सामाजिक सेवा वृत्तीचे असल्याचे कालांतराने लक्षात आले. त्यांनी निस्वार्थ भावनेतून या चळवळीला लोकचळवळीचे स्वरुप दिले. ग्रामीण भागातील स्काऊट गाईड विद्यार्थ्यांना आमदार फंडातून गणवेश उपलब्ध करुन दिले. अशा अनेक उपक्रमाची दखल घेऊन त्यांची राज्याच्या आयुक्तपदी निवड झाली. या निवडीमध्ये कोणत्याही मंत्री, संत्री अथवा लोकप्रतिनिधीची शिफारस नव्हती यातुनच संतोषरावांचे कर्तृत्व सिध्द झाले आहे असे मत व्यक्त केले. यावेळी शासकीय विभागीय पत्रकार अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष वसंत मुंडे म्हणाले, संतोषरावांची पत्रकारीता आणि स्काऊट गाईड चे कार्य जवळून बघता आले. त्यांनी लेखनी आणि कर्तृत्वाला आपले सर्वस्व अर्पण केले. त्यांच्या संकल्पनेतील ‘बीड पॅटर्न’ ला राज्याचे स्काऊट गाईड मुख्य आयुक्त भा.ई. नगराळे यांनी सॅल्युट करुन आता संतोषराव तुम्ही बीड पॅटर्न राज्यात राबवा असे गौरवोद्गार व्यक्त करुन त्यांची राज्याच्या स्काऊट गाईड आयुक्तपदी निवड केली आहे. ही निवड ते निश्चितच सार्थ ठरवतील यात शंका नाही. आता बीडच्या पत्रकारीतेची महाराष्ट्रात स्काऊट गाईडच्या माध्यमातून एक छाप पडेल असा विश्वास व्यक्त केला. सत्कारमूर्ती स्काऊट गाईडचे नवनिर्वाचित राज्य आयुक्त संतोष मानूरकर म्हणाले, निवडीनंतर आज हा जो कौटुंबिक सत्कार होत आहे तो माझ्यासाठी अविस्मरणीय असुन या शुभेच्छांच्या बळावरच मी दिलेली जबाबदारी पार पाडण्यासाठी प्रयत्न करेल. स्काऊट गाईडला लोकचळवळ निर्माण करण्याचा प्रयत्न निश्चित राहील. पत्रकारीतेची जोड असल्याने या चळवळीला निर्णायकरित्या उभे करण्यात राज्यातील पत्रकारांचे योगदान लाभेल असा विश्वास व्यक्त केला. बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रातील पत्रकारांना स्काऊट गाईड आपल्या हक्काचे व्यासपीठ वाटेल असा विश्वास व्यक्त केला. याप्रसंगी श्रमिक पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष महेश वाघमारे यांनी आपल्या खुमासदार शैलीत संतोष मानूरकर यांची पत्रकारीता, त्यांची स्काऊट गाईड संदर्भात असलेली तळमळ, कौटुंबिक वात्सल्य आणि व्यक्तीगत स्वभाव गुण व्यक्त केले. तर सुभाष चौरे, शेखर कुमार, संदीप बेदरे, भागवत तावरे, दिनेश लिंबेकर, प्रमोद कुलकर्णी, अॅड.तेजस नेहरकर आदिंनी मनोगत व्यक्त केले. यावेळी नगरसेवक शेख अमर, शिवसेनेचे बाळासाहेब अंबुरे, अॅड. सचिन गायकवाड, कलंदर पठाण, जिल्हा परिषदेचे ज्येष्ठ कक्ष अधिकारी मोहमद जावेद, शेख रिजवान, बा.म. पवार, आत्माराम वाव्हळ, शेख रईस, लक्ष्मण नरनाळे, सुशांत सुतराळकर, पतंजलीचे रत्नाकर कुलकर्णी, स्काऊट गाईडचे सर्व कर्मचारी आणि स्काऊट गाईडचे गाळाधारक चालक मालक आदिंची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पत्रकार अॅड.तेजस नेहरकर यांची पोलिस अधिक्षक कार्यालयात कायदेशीर सल्लागार म्हणून निवड झाल्याबद्दल सन्माननीय व्यासपीठ आणि पत्रकार संघाच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला.
Add new comment