पोलिसांकडून लेखणीची मुस्कटदाबी बातमी छापली म्हणून गुन्हा दाखल करणार्‍या पोलिसांविरुद्ध संताप

बीड, (प्रतिनिधी):- वृत्तपत्रामध्ये बातमी छापली म्हणून संबंधित वार्ताहर आणि संपादक यांच्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे सदरील तक्रार वाहतुक शाखेच्या पोलिसांनी दिली असुन पोलिसांकडूनच लेखणीची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे यावरुन स्पष्ट होते. या प्रकरणांवरुन पोलिसांविरुद्ध संताप व्यक्त होवू लागला असुन यापुढे पोलिसांना विचारुन आणि दाखवून बातम्या छापायच्या का? असा प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित होवू लागला आहे.
बीड येथील सायं दै.रिपोर्टरमध्ये वाहतुक पोलिसांच्या संदर्भात नेकनूर येथून वृत्त प्रकाशित झाले होते. त्यानंतर वाहतुक पोलिस अधिकार्‍यांनी सदरील वार्ताहर यांच्यासह संपादक, कार्यकारी संपादक यांच्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली असुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बातमी छापली म्हणून संबंधित संपादक आणि वार्ताहराविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याने संताप व्यक्त होवू लागला असुन या माध्यमातून पोलिस प्रशासनाकडून लेखणीची मुस्कटदाबी होत असल्याचे समोर आले आहे. जनतेची दिशाभुल करुन वाहतुक शाखा पोलिसांची प्रतिमा मलिन करण्याच्या उद्देशाने बदनामीकारण मजकुर छापल्याचे तक्रारीत नमुद करण्यात आले आहे. सदरील गुन्हा दाखल झाल्याने माध्यमांमधुन संताप व्यक्त केला जात असुन यापुढे पोलिसांना विचारुन बातम्या छापायच्या की काय? असा प्रश्‍न जिल्हाभरातील पत्रकारांकडून विचारला जाऊ लागला आहे. आपल्याविरुद्ध बातमी छापल्याचा राग मनात धरुन थेट पोलिसात गुन्हा दाखल करत पोलिसांनीच लेखणीची मुस्कटदाबी सुरु केल्याचे यावरुन स्पष्ट होवू लागले आहे. सदरील गुन्हा दाखल झाल्याने वाहतुक पोलिसांच्या विरुद्ध पत्रकारांमधुन संताप व्यक्त होवू लागला आहे.
 
एसपी साहेब, पोलिसांची प्रतिमा मलिन होतेय म्हणून पत्रकारांना टार्गेट कशासाठी?
बीड जिल्हा पोलिस दल आणि प्रसिद्धी माध्यम यांच्यामध्ये चांगल्या प्रकारचा सुसंवाद आहे. पोलिस अधिक्षक जी.श्रीधर यांनी सातत्याने या सुंसवादामध्ये समन्वय ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. असे असतांना केवळ एक बातमी विरोधात छापली म्हणून गुन्हा दाखल करणे कितपत योग्य आहे? असा प्रश्‍न उपस्थित होवू लागला आहे. वाहतुक पोलिस अधिकार्‍याने दिलेल्या फिर्यादीत ‘जनतेची दिशाभुल करुन वाहतुक शाखेच्या पोलिसांची प्रतिमा मलिन करण्याच्या उद्देशाने बदनामीकारण मजकूर छापला आहे.’ असे नमुद करण्यात आले आहे. यावरुन पोलिसांची प्रतिमा मलिन होण्यास पत्रकारांना आणि संपादकांना जबाबदार धरणे यथायोग्य आहे का? केवळ बातमी छापली म्हणूनच प्रतिमा मलिन होतेयं का? याचेही चिंतन व्हायला हवे. पत्रकार आणि संपादक यांना टार्गेट करुन पोलिसांची प्रतिमा स्वच्छ होणार असेल तर मग सर्वांवर गुन्हा दाखल करा आणि एकदाची प्रतिमा उजळून टाका.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.