माणुसकीची हत्या; सैतानांनी घेतला आणखी एका निर्भयाचा बळी

काश्मिरात चिमुकलीची बलात्कार करुन हत्या; देशभरात संतापाची लाट
श्रीनगर, (वृत्तसंस्था):- जम्मू-काश्मीरच्या कठुआमध्ये ८ वर्षीय असिफावर झालेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणातील आठव्या आरोपीविरोधात सोमवारी आरोपपत्र दाखल करण्यात आलं. दरम्यान, या घटनेनंतर आता सर्व स्तरातून कठोर प्रतिक्रिया उमटत आहेत.
१० जानेवारीला असिफा खेचर चारण्यासाठी कठुआजवळच्या जंगलात गेली होती. तिथून तिचं एका अल्पवयीन आरोपीनं अपहरण केलं आणि जवळच्या मंदिराच्या तळघरात लपवलं. सात ते आठ दिवस नराधमांनी तिच्यावर आळीपाळीने अमानूष अत्याचार केले. या नराधमांनी अनन्वित अत्याचारानंतर असिफाची हत्या केली. शोधाशोध करुन थकल्यावर १२ जानेवारीला असिफाच्या कुटुंबियांनी पोलिसात तक्रार केली.
१७ जानेवारीला जंगलात असिफाचा मृतदेह अतिशय भीषण अवस्थेत आढळून आला. या प्रकरणाचा तपास स्थानिक पोलिसांकडून एसआयटीकडे सोपवण्यात आला. मुख्य आरोपी आणि माजी सरकारी अधिकारी संजी राम हा दोन महिने फरार होता. मार्चमध्ये संजी राम स्वत: पोलिसांसमोर हजर झाला. मेरठमधून त्याच्या मुलाला विशालला अटक करण्यात आली.संजी रामला मदत करणं आणि असिफावर अत्याचार केल्याप्रकरणी पोलीस अधिकार्‍यांनाही अटक करण्यात आली आहे. दोन महिन्यांनी आरोपपत्र दाखल करण्यास वकिलांनी विरोध केल्यानं देशभरातून संतापाची लाट उसळली आहे.
दोषींना फासावर लटकवा
मानवी हक्क अभियानचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन
बीड- जम्मू-काश्मिरमध्ये मुस्लिम समाजातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आली. माणुसकीला काळीमा फासणार्‍या घटनेचा मानवी हक्क अभियानच्यावतीने निषेध नोंदविण्यात आला असुन पिडीतेचे नाव आणि तिची वैयक्तीक माहिती माध्यमांना पुरविणार्‍यांना सह आरोपी करुन अत्याचार आणि हत्या प्रकरणातील दोषींना भर चौकात फासावर लटकवा अशी मागणी जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. या संबंधात आज दुपारी निवेदन देण्यात आले असुन निवेदनावर मधुकर लोंढे, शेख शरीफ, अमोल कांबळे, शेख तालीब, मोमीन मारुफ, राजू आरे, कल्याण ताकतोडे, दादा हातागळे, विलास मोमीन, वैभव लोंढे आदिंच्या स्वाक्षर्‍या आहेत.
एमआयएमकडून निषेध; जिल्हाधिकार्‍यांना निवेदन
बीड- जम्मू-काश्मिरमधील कठूआ जिल्ह्यात अल्पवयीन मुलीवर अमानुषपणे अत्याचार करुन तिची हत्या करणार्‍यांना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी एमआयएमच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकार्‍यांमार्फत राष्ट्रपतींकडे निवेदनाद्वारे केली आहे. माणुसकीला काळीमा फासणार्‍या घटनेचा निषेध नोंदवत या प्रकरणात पोलिस प्रशासन व हिंदूत्ववादी संघटनांच्या पाठबळामुळे संबंधित नराधमांचे मनोबल वाढल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. निवेदनावर एमआयएमचे जिल्हाध्यक्ष शेख निजाम, जिल्हा सचिव हाजी आयुब पठाण, रफिक नाशाद, हाफेज शेख अशपाक, सलामसेठ आदिंच्या स्वाक्षर्‍या आहेत.
बीडमध्ये उद्या बैठक
जम्मू-काश्मिरमधील एका आठ वर्षीय चिमुकलीवर निर्दयीपणे अत्याचार करुन तिची हत्या केल्याची घटना घडली आहे. या पार्श्‍वभुमीवर केंद्र सरकार कोणतीच ठोस पाऊले उचलत नसल्याने देशभर संतापाची लाट उसळली आहे. याच प्रश्‍नावर बीड येथे उद्या दि.१४ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता तकीया मस्जिद येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
 

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.