बीड जिल्ह्यात अजुनही ‘ती’ नकोशीच! शेतात आढळले स्त्री जातीचे जिवंत अभ्रक
बीड, (प्रतिनिधी):- बेटी बचाओ, बेटी पढाओ यासह शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून ‘मुलगी वाचवा’ असा संदेश दिला जात असुनही बीड जिल्ह्यात अजुनही ‘ती’ नकोशीच असल्याचा प्रकार समोर आला आहे. मैंदा पोखरी (ता.बीड) येथील एका शेतात टोमॅटोच्या फासामध्ये एका दिवसाचे स्त्री जातीचे जिवंंत अभ्रक आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. तेथील ग्रामस्थांनी सदरील अभ्रक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असुन त्याच्यावर उपचार सुरु आहे. दरम्यान सदरील अभ्रक कोणी आणि केंव्हा आणून टाकले याचा तपास पोलिस सुत्रांकडून सुरु आहे. दुपारी उशिरापर्यंत या प्रकरणात गुन्हा दाखल झालेला नव्हता.
बीड तालुक्यातील मैंदा पोखरी येथील लालासाहेब बाबुराव घुले यांच्या शेतातील टोमॅटोच्या फासामध्ये स्त्री जातीचे जिवंत अभ्रक आज सकाळी आढळून आले. त्याची माहिती मिळताच उपसरपंच सिताराम घुमरे, बाळासाहेब घोरड, उत्रेश्वर घुमरे, चंद्रशेखर घुमरे आदिंनी सदरील अभ्रक जिल्हा रुग्णालयात आणले. सदरील अभ्रक एका दिवसाचे असुन त्याच्यावर बालकांच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पिंपळनेर ठाण्याचे पीएसआय काळे यांनी घटनास्थळी भेट दिली. सदरील अभ्रक अनैतिक संबंधातून जन्मले असावे असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला असुन दुपारी उशिरापर्यंत या प्रकरणात गुन्हा दाखल झालेला नव्हता. दरम्यान यापुर्वी स्त्री भ्रुण हत्येच्या घटनेने जिल्ह्याचे नाव राज्यात बदनाम झाले होते. त्यानंतर राज्य शासनाने विविध योजनांच्या माध्यमातून मुलगी वाचवा असा संदेश देवूनही सदरील प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे.
Add new comment