लाइव न्यूज़
आदल्या दिवशी झालेल्या भांडणाच्या रागातून कोपलेंवर हल्ला; सहा जणांविरूध्द गुन्हा दाखल
Beed Citizen | Updated: April 10, 2018 - 4:51pm
अंबाजोगाई, (प्रतिनिधी):-सोमवारी सकाळी अंबाजोगाई नगर पालिकेचे स्वीकृत सदस्य कमलाकर कोपले यांच्या प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना घडली होती. याप्रकरणी रात्री उशिरा सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
नगरसेवक कमलाकर शिवाजीराव कोपले यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केल्यानुसार दि. ८ एप्रिल रोजी रात्री ११ वाजता त्यांच्या चतुरवाडी शिवारातील श्रीजित हॉटेलचा व्यवस्थापक बबन सुरवसे याने लॉजवरील काही ग्राहक आपसात हाणामारी करत असल्याचे फोनवरून कळविले. त्यामुळे कमलाकर कोपले आणि रोहन कोपले यांनी लॉजवर जाऊन मध्यस्थी करून भांडण सोडविले. यावेळी त्यातील एकाने कोपले यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी रविवारी रात्री व्यवस्थापक सुरवसे याच्या तक्रारीवरून आकाश नेहरकर ऊर्फ बिलाल याच्यासहित तिघांवर अंबाजोगाई ग्रामीण पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला. दुसर्या दिवशी म्हणजेच दि. ९ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता आ. आर.टी. देशमुख हे दिलीप काळे यांच्या हनुमान नगर येथील निवासस्थानी आल्याने त्यांना भेटण्यासाठी कमलाकर कोपले तिथे गेले. थोडावेळ चर्चा केल्यानंतर आ. देशमुख तिथून निघून गेले आणि कोपले, संजय गंभिरे हे दिलीप काळे यांच्या घराच्या आवारात बोलता थांबले. त्याचवेळी ११.४५ वाजताच्या सुमारास काळ्या रंगाच्या जीपमधून आकाश नेहरकर हा अन्य पाच साथीदारांना घेऊन काळे यांच्या कंपाऊंडमध्ये घुसला आणि आदल्या दिवशी रात्रीच्या भांडणाचा राग मनात धरून कमलाकर कोपले यांच्याकडे बघत ‘याला खतम करून टाका, तलवार लेके आओ’ असे म्हणत त्यांच्यावर लाकडी दंडुके आणि फायटरच्या साह्याने प्राणघातक हल्ला केला. यावेळी कोपले यांना सोडविण्याचा प्रयत्न करणारे दिलीप काळे आणि संजय गंभिरे यांना लाकडाने मारहाण करण्यात आली. या हल्ल्यात कमलाकर कोपले हे गंभीर जखमी झाले असून त्याच्यावर स्वा.रा.ती. रुग्णालयात उपचार सुरु आहेत. झटापटीत कोपले यांच्या गळ्यातील दोन तोळ्याचे लॉकेट आणि हातातील घडयाळ गहाळ झाल्याचेही त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे.
याप्रकरणी कमलाकर कोपले यांच्या तक्रारीवरून सोमवारी रात्री उशिरा आकाश नेहरकर आणि अनोळखी पाच जणांवर कलम ३०७, ३२३, ४४७, १४३, १४७, १४८, १४९, ५०४ अन्वये अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आडके हे करत आहेत.
Add new comment