खंबाटकी घाटात मजुरांना घेऊन जाणार्‍या टेम्पोला भीषण अपघात, १८ जणांचा मृत्यू, २० जखमी

पुणे, (प्रतिनिधी):- पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील खंबाटकी घाटात ३५ कामगारांना घेऊन जाणारा एक टेम्पो एस कॉर्नरवर उलटला. आज मंगळवारी पहाटे साडेपाच वाजता झालेल्या या अपघातात १८ जण ठार तर २० जखमी झाले. कर्नाटकच्या विजापूर जिल्ह्यातील तिकोटा येथून शिरवळच्या औद्योगिक वसाहतीत कामासाठी ते कामगार निघाले होते. मालवाहतूक करणार्‍या या टेम्पोत ( केए -३७/६०३७ ) ३५ पेक्षाही जास्त कामगार दाटीवाटीने बसले होते. खंबाटकी बोगदा ओलांडल्यानंतर नेहमीच्या अपघातग्रस्त एस कॉर्नरवर हा भरधाव टेम्पो उलटला.
रस्त्याच्या कडेला बांधलेल्या सहा फुटी कठड्यावरून हा टेम्पो बाहेर फेकला गेला. टेम्पोत बांधकामाचे अवजड साहित्य असल्यामुळे यातील कामगारांना याचा फटका बसला. चार महिला अन् एक मुलगा यांच्यासह सुमारे १८ जण जागीच ठार तर बाकीचे २० गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये टेम्पो चालकाचाही समावेश आहे. या अपघातानंतर घटनास्थळी आक्रोश सुरू झाला. दरम्यान याच टेम्पोच्या पाठीमागून येणार्‍या त्यांच्याच टोळीतील दोघा दुचाकीस्वारांनी तात्काळ ही घटना खंडाळ्याला येऊन पोलिसांना सांगितली. सहाय्यक पोलीस अधीक्षक विजय पवार, खंडाळ्याचे सहायक पोलीस निरीक्षक युवराज हांडे अन् त्यांच्या सहकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना खंडाळ्याच्या ग्रामीण रुग्णालयात पाठविले. दरम्यान पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनीही घटनास्थळी येऊन पाहणी केली.
शेळी मात्र बचावली..
गावाकडून निघताना या टेम्पोमध्ये जनावरे कोंबावी, अशी माणसं कोंबली होती. याच गर्दीत एक शेळीही टेम्पोत होती. भीषण अपघाताचा फटका सर्व मंडळींना बसला. मात्र या शेळीला थोडंही खरचटलं नव्हतं. खंडाळा घाटातील वळण धोकादायक असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे केली होती. यापूर्वी देखील याठिकाणी अनेक अपघात झाले असून अनेकांना यामध्ये जीव गमवावे लागले आहेत. त्यामुळे रस्त्यावरील हे वळण बदलावे अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.