लाइव न्यूज़
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन
बीड, (प्रतिनिधी):- मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीप्रश्नी बहुजन समाज पार्टी आक्रमक झाली असुन शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रक्रियेत गुंतवल्याने त्यांच्यावर अन्याय होत आहे. विद्यार्थ्यांना जाचक अटींचा सामना करावा लागत असल्याचा आरोप करत बसपाच्यावतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
बीड जिल्ह्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती तीन वर्षापासुन बंद अवस्थेत आहे. केवळ मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती चालू असुन सन २०१६ ते २०१८ हे शैक्षणिक संपुनही विद्यार्थ्यांच्या खात्यावर शिष्यवृत्ती जमा झाली नाही. ऑनलाईन प्रक्रियेमुळे मोठा गोंधळ उडाला असुन शिष्यवृत्ती अर्ज भरण्यापासुन त्याचे कागदपत्र सादर करण्यापर्यंत मोठा खर्च येऊ लागला आहे. सदरील प्रक्रिया पुर्ण होत नाही तोच भाजप सरकार वारंवार नवीन नवीन शासन निर्णय काढून संभ्रम निर्माण करत आहे. त्यामुळे आक्रमक झालेल्या बसपाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती वेळेवर व महागाई निर्देशांकानुसार वाढवून थेट त्यांच्या राष्ट्रीयकृत बँक खात्यावर जमा करावी, गुणवत्ता व शाहू महाराज शिष्यवृत्ती सुरु करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर संजय मिसाळ, पंकज कांबळे, प्रशांत विर आदिंच्या स्वाक्षर्या आहेत.
Add new comment