लाइव न्यूज़
बीडची कॉंग्रेस रस्त्यावर उतरली!
केंद्र व राज्याच्या निषेधार्थ जिल्हा कचेरीसमोर उपोषण
बीड, (प्रतिनिधी):- दलितांवर देशात होणारे अत्याचार आणि ऍट्रॉसिटी कायदा कमकुवत झाल्याच्या निर्णयाविरोधात कॉंग्रेस रस्त्यावर उतरली आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कायालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले. उपोषणाच्या निमित्ताने जिल्हाभरातील कॉंग्रेस रस्त्यावर उतरल्याचे चित्र पहायला मिळाले. माजी खा.रजनीताई पाटील, माजी आ.सिराज देशमुख, जिल्हाध्यक्ष पापा मोदी, शिक्षण सभापती राजेसाहेब देशमुख यांच्यासह सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जिल्हाकचेरीसमोर ठिय्या मांडून उपोषण केले.
बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कॉंग्रेसच्यावतीने आज लाक्षणिक उपोषण करण्यात आले. केंद्र व राज्य सरकारचा निषेध नोंदवत जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले. राज्यातील सामाजिक सलोखा व शांतता कायम ठेवावी, पेट्रोल डिझेलला जीएसटी कक्षेत आणून इंधन दरवाढ करु नये, राज्यातील दलित-आदिवासी अल्पसंख्यांक यांच्यावरील अन्याय अत्याचार रोखण्यात यावा, शेतकर्यांना संपुर्ण कर्जमाफी देवून बेरोजगारांना नौकर्या देण्यात याव्या आदि मागण्यांचा निवेदनात समावेश आहे. उपोषणस्थळी माजी खा.रजनीताई पाटील, माजी आ.सिराज देशमुख, जिल्हाध्यक्ष पापा मोदी, राजेसाहेब देशमुख, दादासाहेब मुंडे, सर्जेराव काळे, आदित्य पाटील, अशोक हिंगे, फरीद देशमुख, संजय दौंड, राहूल सोनवणे, पशुपतीनाथ दांगट, प्रविण शेप, नारायण होके, जुबेर चाऊस, अंजली घाडगे, मिनाक्षी पाडुळे, कुंदाताई काळे, ऍड.श्रीनिवास बेदरे, राहूल टेकाळे, संभाजी जाधव, संतोष निकाळजे, गोविंद साठे, भास्कर केदार आदिंसह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
गटा-तटातील कॉंग्रेस एकत्र येताच जिल्हाकचेरी दणाणली
बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषणाच्या निमित्ताने जिल्ह्यातील कॉंग्रेस आज एकत्र आली. गटा-तटामध्ये आणि नेत्यांच्या वैयक्तीक हेवेदाव्यात विखूरलेले पदाधिकारी एकत्र येताच जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दणाणला. कॉंग्रेसमधील पदाधिकार्यांची एकजुट अशाच प्रकारे निवडणूक सामोरे आल्यास सत्ताधार्यांना नक्कीच घाम फोडणारी ठरेल अशी चर्चा शहरात ऐकावयास मिळाली.
झेडपीच्या सत्तेतील वाटेकरीही उपोषणात दिसले
जिल्हा परिषदेवर भाजप मित्र पक्षांची सत्ता आहे. सत्तेचे समीकरण ठरवतांना भाजपने शिवसेना, शिवसंग्रामला विश्वासात घेतांनाच कॉंग्रेसचा ‘हात’ही सोबत घेतला. त्यानिमित्ताने सत्तेत कॉंग्रेसलाही मानाचे स्थान मिळाले. आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या लाक्षणिक उपोषणात झेडपीच्या सत्तेतील वाटेकरी असलेले शिक्षण सभापती राजेसाहेब देशमुख हे देखील अग्रभागी दिसुन आले.
Add new comment