लाइव न्यूज़
भाजप आमदार कर्डिले यांना अटक
Beed Citizen | Updated: April 9, 2018 - 3:30pm
नगर, (प्रतिनिधी):- शिवसेना पदाधिकार्यांच्या हत्येनंतर पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयाची तोडफोड केल्याप्रकरणी भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांना अटक करण्यात आली आहे. कर्डिले यांचे जावई आमदार संग्राम जगताप यांची पोलिसांच्या ताब्यातून सुटका करण्यासाठी पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयाची तोडफोड केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आलेला आहे. कर्डिले यांची अटक केवळ तोडफोड प्रकरणाशी संबंधित असून त्याचा या हत्येशी काहीही संबंध नसल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं.
केडगाव येथे दोन शिवसेना पदाधिकार्यांची हत्या झाल्यानंतर आमदार शिवाजी कर्डिले, माजी आमदार दादाभाऊ कळमकर आणि माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्यासह २५० ते ३०० कार्यकर्त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयाची तोडफोड केली होती. त्यामुळे केडगाव पोलीस ठाण्यात या सर्वांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यापैकी २२ जणांना काल अटक करण्यात आली होती. पोलिसांनी याप्रकरणी आज शिवाजी कर्डिले यांना आधी ताब्यात घेतले आणि नंतर त्यांना अटक केली.
या सर्वांवर शासकीय मालमत्तेचं नुकसान केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच भादंवि कलम ३५३, ३३३, १४३, १४७, १४८, १४९, ४५२, ४२७, ३२३ आणि ५०४ सह सार्वजनिक विद्रुपीकरण कलम ३ आणि ७ सह सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक कायदा कलम ३ अन्वये या सर्वांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. इतर फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.
Add new comment