लाइव न्यूज़
बीएसएनएल अधिकार्यांकडून ठेकेदारांना झुकते माप तर कामगारांकडे दुर्लक्ष
Beed Citizen | Updated: April 9, 2018 - 3:29pm
बीड, (प्रतिनिधी):- बीएसएनएलच्या अधिकार्यांकडून ई.ओ.आय.टेंडर अंतर्गत ठेकेदारांना झुकते माप दिले जात असून कमी वेतनावर निष्ठेने काम करणार्या कामगारांकडे मात्र दुर्लक्ष केले जात आहे. याप्रश्नी बीएसएनएल लेबर ऍन्ड कॉन्ट्रॅक्ट लेबर युनियन जिल्हा शाखेच्यावतीने आज उपमहाप्रबंधकांना निवेदन देण्यात आले आहे.
बीड जिल्ह्यात बीएसएनएल र्ई.ओ.आय.टेंडर अंतर्गत ठेकेदारी कामगारांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. जिल्हाभरात १०८ पेक्षा अधिक कामगार कार्यरत आहेत. जिल्हांतर्गत ४ वेगवेगळ्या विभागामध्ये तालुक्यानुसार नविन ई.ओ.आय.चे लेबर टेंडर आपल्या विभागाकडून काढण्यात येवून त्यानुसार ४ ठेकेदारी एजन्सीमार्फत कामगार दिलेले आहेत. संबंधीत कंपनीला किमान वेतनदर ४३३ रूपये प्रतिदिवस प्रमाणे ठेका दिला आहे. परंतू संबंधीत ठेकेदार कामगाराला १२५ ते १३० रूपये प्रतिदिवस प्रमाणे वेतन देण्याचे सांगून काम करून घेत आहेत. वास्तविक पाहता संबंधीत कामगाराला नियमानुसार ४९५ रूपये वेतन मिळणे आवश्यक असतांना ठेकेदार आपल्या सोयीप्रमाणे वेतन देवून कामगारांचा मानसिक आणि आर्थिक छळ करत असल्याचा आरोप संघटनेच्यावतीने करण्यात आला आहे. गेल्या १८ वर्षापासून कमी वेतनावर पुर्ण निष्ठेने काम करूनही किमान वेतन मिळत नाही. किमान वेतन दरानुसार टेंडर काढूनसुध्दा आम्हाला ते लागू केले जात नसल्याने लेबर युनियनने उपमहाप्रबंधकांना निवेदन देवून याप्रकरणाकडे व्यक्तीगत लक्ष देवून त्याची चौकशी करण्याची मागणी केली आहे. यावेळी जिल्हा सरचिटणीस सदाशिव पवळ, परशुराम जेवे, पाखरे, उदावंत, मुंडे, गर्गिणे, चाटे, चव्हाण आदींची उपस्थिती होती.
Add new comment