लाइव न्यूज़
शेतकर्यांनी राष्ट्रीय महामार्ग २११ अडविला

गेवराई/मादळमोही, (प्रतिनिधी):- कारखानदारांनी ऊसाच्या एफआरपीप्रमाणे बिलाची रक्कम तात्काळ अदा करावी, त्यावरील थकीत व्याजही देण्यात यावे या मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली शेतकर्यांनी आज दुपारी राक्षसभुवन फाटा-खामगाव रस्त्यावर ठिय्या आंदोलन करत राष्ट्रीय महामार्ग २११ अडविला. यावेळी महामार्गावरील वाहतुक काही वेळ ठप्प झाली होती. साखर आयुक्त आणि तहसिलदारांनी आंदोलनस्थळी येऊन निवेदन स्विकारले. त्यानंतर वाहतुक सुरळीत झाली.
गेवराई तालुक्यात या वर्षी ऊसाचे चांगले उत्पन्न झाले आहे. शेतकर्यांनी जय भवानी साखर कारखाना, माजलगाव साखर कारखाना, समर्थ साखर कारखाना, छत्रपती साखर कारखाना, गंगामाई साखर कारखाना, जय महेश साखर कारखाना व इतर साखर कारखान्यांनी शेतकर्यांचा ऊस गाळपासाठी नेला आहे.
गेल्या दोन ते तीन महिन्या पासून ऊसाचे बील थकले आहे. शेतकरी पैशासाठी साखर कारखान्यावर चकरा मारून हैराण झाले आहेत मात्र हे कारखानदार बिल काढत नसल्याने शेतकर्यांच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर आज उतरली असून सकाळी आकरा वाजता औरंगाबाद- सोलापूर महामार्गावरील राक्षसभुवन फाटा येथे भव्य रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्याक्ष राजेंद्र डाके, पूजा मोरे,कुलदीप करपे,जयदीप वायळकर,बाळासाहेब काटे,मच्छिन्द्र गावडे,नवनाथ आबुज,जोत्सना खोड,योगेश्वरी डाके,अश्विनी सपकाळ,विक्रम सुखदेव,संग्राम शिंदे,मिलिंद तायड, भारिपचे गौतम भोले, मिलिंद तुरुकमारे, गेवराई तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष चंद्रकांत हाकदार व विविध पत्रकार तसेच छावाचे अंगद मोहिते, राहुल आखाडे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी बांधवांची उपस्थिती होती. हे आंदोलन जवळपास आर्धा तास सुरू होते या आंदोलनाला प्रादेशिक साखर विभागाचे शेख व तहसीलदार यांनी निवेदन स्वीकारले. या प्रश्नावर पंधरा दिवसात तोडगा कडून शेतकर्यांना ऊस बिल मिळून द्यावे नसता पुन्हा तीव्र आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा स्वाभिमानी संघटनेच्या पदाधिकारी यांनी दिला आहे.
Add new comment