लाइव न्यूज़
पाच वर्षीय बालिकेवर अत्याचार
परळी, (प्रतिनिधी):- घरासमोर खेळत असलेल्या पाच वर्षीय बालिकेस घरासमोर राहणार्या पन्नास वर्षीय नराधमाने स्वतःच्या घरात नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याची घृणास्पद घटना दि. ७ एप्रिल रोजी परळी शहरातील बरकतनगर भागात उघडकीस आली.
शहरातील बरकत नगर भागातील एक पाच वर्षीय बालिका शनिवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास घरासमोर खेळत होती. यावेळी समोरच्या घरात किरायाने राहणार्या इद्रीस बशीर शेख या नराधमाने तिला स्वतःच्या घरात नेले आणि अत्याचार केला. त्यानंतर पिडीत चिमुरडी रडत रडत स्वतःच्या घरी गेली आणि तिच्या आईने रडण्याचे कारण विचारल्यानंतर तिने घडलेला प्रकार आईला सांगितला. संतप्त झालेल्या आईने इद्रीस याच्या घरी जाऊन जाब विचारला असता तो पळून जाऊ लागला. मात्र पिडीतेच्या आईने आरडाओरडा करून आजूबाजूच्या लोकांना बोलावले. जमलेल्या लोकांनी इद्रीसला पकडून त्याला बेदम चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले.
याप्रकरणी पिडीत बालिकेच्या आईच्या तक्रारीवरून इद्रीस बशीर शेख याच्यावर कलम ३७६(२)(१) आणि बाल लैंगिक अत्यचार प्रतिबंधक (पोक्सो) कायद्यान्वये संभाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. दरम्यान, माणुसकीला काळिमा फासणार्या या घटनेने परळी शहरात एकच खळबळ उडाली असून नराधमावर कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
Add new comment