नगरमध्ये तणाव, शिवसेनेचे शहर उपप्रमुखासह एकाची हत्या, राष्ट्रवादीच्या आमदाराला अटक

नगर- केडगाव उपनगरातील शाहूनगर भागातील सुवर्णनगर येथे शिवसेनेचे शहर उपप्रमुख संजय केशव कोतकर व वसंत आनंदा ठुबे यांच्यासह एकाच गावठी कट्ट्यातून गोळ्या घालून तसेच कोयत्याने वार करत हत्या करण्यात आली. ही घटना शनिवारी सायंकाळी ६ वाजता घडली. या दुहेरी हत्येप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम अरुण जगताप यांना पोलिसांनी रविवारी पहाटे ३ वाजता अटक केली.
नगरमध्ये तणाव...कडकणीत बंद
या दुहेरी हत्येच्या पार्श्वभूमीवर शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. नगर शहरातील वातावरण तणावपूर्ण असून रविवारी केडगाव, श्रीगोंदा, अकोले, जामखेड येथे कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. दरम्यान, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विनयकुमार चौबे नगरमध्ये दाखल झाले आहेत.
आमदार संग्राम अरुण जगताप यांना अटक...
या दुहेरी हत्येप्रकरणी राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार संग्राम अरुण जगताप यांना पोलिसांनी अटक केली आहे. राष्ट्रवादीचे विद्यमान विधानपरिषदेचे आमदार अरुण बलभीम जगताप, भाजपचे विद्यमान आमदार शिवाजी भानुदास कर्डिले, तसेच खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले कॉंग्रेसचा माजी शहर जिल्हाध्यक्ष भानुदास एकनाथ कोतकर व कांग्रेसचा माजी महापौर संदीप कोतकर यांनाही केले आरोपी. यांच्या सांगण्यावरून इतर आरोपींनि प्रत्यक्ष हत्याकांड घडवून आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यामुळे गुन्ह्यात १२० ब (संगनमताने कट रचणे), खून, दंगल, भारतीय हत्यार कायदा कलम लावण्यात आले आहेत.
दरम्यान, संदीप गुंजाळ याने पारनेर पोलिस ठाण्यात स्वत: हजर होत गुन्ह्याची कबुली दिली असल्याची माहिती पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी दिली आहे. गुंजाळ याच्याकडून एक गावठी कट्टा, गुप्ती व पत्रकार असल्याचे ओळखपत्र जप्त करण्यात आले आहे.
शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको, पोलिसांच्या वाहनावर दगडफेक
घटनेची माहिती शहरात पसरताच संतप्त जमावाने पोलिसांच्या वाहनांवर दगडफेक केली. त्यानंतर नगर-पुणे महामार्गावर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केला. या घटनेमुळे केडगावसह संपूर्ण नगर शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, याप्रकरणी एक युवक स्वत:हून पोलिसांसमोर हजर झाला.
रक्तबंबाळ अवस्थेत केला फोन
केडगावातील पोटनिवडणूक शुक्रवारी पार पडली. या वेळी विरोधकांनी शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिल्याबाबतचे निवेदन देण्यासाठी शिवसेनेचे पदाधिकारी सायंकाळी जिल्हा पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्याकडे गेले होते. निवेदन देऊन बाहेर येताच जखमी संजय कोतकर यांचा शहरप्रमुख दिलीप सातपुते यांच्या मोबाइलवर फोन आला. मला गोळ्या घातल्या आहेत, तुम्ही ताबडतोब या, मारेकरी वसंताच्या मागे गेले आहेत, असे कोतकर म्हणाल्याचे सातपुते यांनी सांगितले.
२५ जणांविरोधात फिर्याद
मृत संजय कोतकर यांचा मुलगा संग्राम कोतकर याच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी २५ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती. फिर्यादीत नऊ जणांची नावे नमूद करण्यात आली, तर अन्य अज्ञात असा उल्लेख आहे. दरम्यान, पत्रकार, छायाचित्रकारही घटनेची माहिती घेण्यासाठी पोहोचले. या वेळी संतप्त जमावाने पोलिस व पत्रकारांना शिवीगाळ करत दगडफेक केली. काहींना जमावाने धक्काबुक्की केली. रॅपिड ऍक्शन फोर्सला पाचारण करण्यात आले.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.