नगरमध्ये तणाव, पालकमंत्री राम शिंदे थीम पार्कच्या उद्घाटनाला

शिर्डी, (प्रतिनिधी):- अहमदनगर जिल्ह्यात तणावाचं वातावरण असताना पालकमंत्री राम शिंदे मात्र एका खासगी कार्यक्रमाला हजेरी लावत आहेत. शिर्डीत मालपाणींच्या थीम पार्कच्या उद्घाटनासाठी त्यांनी हजेरी लावली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटीलही या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित आहेत.
अहमदनगरमध्ये झालेल्या शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांडामुळे जिल्ह्यात तणावाचं वातावरण आहे. असं असताना राम शिंदे यांनी शिर्डीत खाजगी कार्यक्रमाला हजेरी लावल्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. एकीकडे, कायदा सुव्यवस्थेचा विचार करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला दौरा रद्द केला होता. राज्यातील मंत्री अहमदनगरला येत असताना पालकमंत्री राम शिंदे मात्र कौतुक सोहळ्यात व्यस्त असल्याने चीड व्यक्त केली जात आहे. बिहारलाही लाजवेल असा प्रकार काल अहमदनगरमधल्या पोटनिवडणुकीदरम्यान घडला. राजकीय वैमनस्यातून दोन शिवसैनिकांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या प्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्यासह चौघांना अटक करण्यात आली आहे.
शनिवारी अहमदनगरमधल्या केडगाव प्रभाग क्रमांक ३२ मधल्या पोटनिवडणुकी दरम्यान हा रक्तरंजित प्रकार घडला. शिवसेनेनं  अहमदनगर बंदची हाक दिल्यानंतर रस्त्यांवर कडकडीत बंद पाळल्याचं चित्र पाहायला मिळालं. अहमदनगर शहरात शिवसेनेने निषेध मोर्चा काढला. या मोर्चात मोठ्या संख्येनं शिवसैनिक सहभागी झाले होते. आमदार संग्राम जगताप यांचे वडील आमदार अरुण जगताप आणि भाजप आमदार शिवाजी कर्डिले, भानुदास कोतकर आणि त्यांचा मुलगा- माजी महापौर संदीप कोतकर यांच्यासह ५० जणांवर कट रचल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संग्राम जगतापांसह विजयी उमेदवार असलेल्या विशाल कोतकरचे वडील बाळासाहेब कोतकर, संदीप गुंजाळ आणि भानुदास कोतकर यांना अटक करण्यात आली आहे. आमदार संग्राम जगताप यांना शनिवारी रात्रीच ताब्यात घेण्यात आलं होतं, त्यानंतर रविवारी पहाटे त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्याबरोबरच त्यांचे वडील आमदार अरुण जगताप आणि सासरे आमदार शिवाजी कर्डिले यांनाही अटक होण्याची शक्यता आहे.
सर्व आरोपींना अटक केली जात नाही, तोपर्यंत दोन्ही शिवसैनिकांच्या पार्थिवाचे अंत्यविधी करणार नाही, अशी भूमिका शिवसेनेने घेतल्याचं शहराध्यक्ष दिलीप सातपुते यांनी सांगितलं.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.