लाइव न्यूज़
बीड जिल्ह्यात अर्ध्या रात्री तुफान आलंया
बीड, (प्रतिनिधी):- पाणी फाउंडेशनच्या ‘सत्यमेव जयते’ वाटरकप स्पर्धेस आजपासुन सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील पाच तालुक्यांतील शेकडो गावे स्पर्धेमध्ये सहभागी झाले असुन मध्यरात्री १२ वाजता अनेक गावांमध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली. ७८ गावांनी रात्रीपासुनच हातात खोरे, टिकाव आणि टोपलं घेत काम सुरु केले. हातात मशाली घेऊन पुढे आलेले तरुण आणि ग्रामस्थ पाहता अर्ध्या रात्री खरच ‘तुफान आलंया’ ची प्रचिती अनेक गावांनी अनुभवली.
बीड जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये पाणी फाउंडेशनच्या ‘सत्यमेव जयते’ वाटरकप स्पर्धेला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील एकुण ४१३ गावांचा वाटरकप स्पर्धेत समावेश झाला आहे. गतवर्षी दुसरे आणि तिसरे पारितोषिक पटकावणार्या जिल्ह्यात यावर्षी मोठा उत्साह पहायला मिळत आहे. दि.८ एप्रिल ते २२ मे या दरम्यान होत असलेल्या स्पर्धेचा नारळ मध्यरात्री विविध गावांमध्ये फुटला. अंबाजोगाई तालुक्यातील ५, केज ७, आष्टी २५, परळी २०, धारुर २१ अशा एकुण ७८ गावांमध्ये रात्री १२ वाजण्याच्या सुमारास प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली. तरुणांसह महिला, पुरुष हातात खोरे, टिकाव आणि टोपले घेऊन अंधार्या रात्री प्रत्यक्ष कामावर आले होते. हातात मशाली घेऊन पुढे आलेल्या तरुणांनी ग्रामस्थांसह अर्ध्या रात्री श्रमदान केले. काही गावांमध्ये जनरेटर उपलब्ध करुन प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी विज पुरवठा करण्यात आला होता. रात्री ७८ गावांमध्ये तर आज सकाळी १२२ गावांमध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे. अन्य गावांमध्येही ही स्पर्धा राबविण्यात येत असुन तिथेही कामे सुरु झाली आहेत. चित्रपट अभिनेते अमीर खान यांच्या पाणी फाउंडेशन अंतर्गत ‘सत्यमेव जयते’ वाटरकप स्पर्धा ४५ दिवस सुरु राहणार असुन त्यानंतर गावातील कामांचे मुल्यमापन करुन संबंधित गावांना लाखोंचे पारितोषिक देवून गौरविण्यात येणार आहे.
मध्यरात्री ७८ गावांमध्ये कामे सुरु-जिल्हाधिकारी एम.डी.सिंह
पाणी फाउंडेशनतर्ंगत जल संधारणाची कामे हाती घेण्यात आली आहे. सत्यमेव जयते वाटरकप स्पर्धेत पाच तालुक्यांचा समावेश असुन या पाच तालुक्यांमधील ७८ गावांमध्ये मध्यरात्री ग्रामस्थांनी कामे सुरु केल्याची माहिती जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी दिली.
महिला सरपंच, उपसरपंचाचा सत्कार
अंबाजोगाई तालुक्यातील पठाण मांडवा येथे सत्यमेव जयते वाटरकप स्पर्धेचा शुभारंभ माजी आ.पृथ्वीराज साठे यांच्या हस्ते करण्यात आला. या गावाचे वैशिष्ट्ये म्हणजे या ठिकाणी सरपंच आणि उपसरपंच या दोन्ही पदावर महिला आहेत. दोन्ही महिलांनी गावाला प्रोत्साहन देत वाटरकप स्पर्धेत भाग घेण्यासाठी प्रवृत्त केले त्याबद्दल माजी आ.साठे यांनी दोघींचा सत्कार केला. यावेळी ग्रा.पं.सदस्य, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Add new comment