बाबा सिद्दीकींवर ईडीची मोठी कारवाई, 33 फ्लॅट्स जप्त
मुंबई, (प्रतिनिधी):- एसआरए घोटाळ्याप्रकरणी काँग्रेसचे माजी आमदार बाबा सिद्दीकींवर ईडीने मोठी कारवाई केली आहे. काल वांद्रे इथल्या सिद्दीकींच्या कंपनीचे 33 फ्लॅट्स जप्त करण्यात आलेत. त्याचे मूल्य तब्बल 462 कोटी रुपये आहे. ही सर्व मालमत्ता मे. पिरॅमिड डेव्हलपरची असून, झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत अतिरिक्त चटईक्षेत्र निर्देशांक (एफएसआय) मिळण्यासाठी खोटी कागदपत्रे सादर केल्याचा कंपनीवर आरोप आहे. याविरोधात पीएमएलए अंतर्गत गुन्हा नोंदवला होता.
या घोटाळ्यात काँग्रेसचे माजी आमदार बाबा सिद्दीकी यांचाही संबंध समोर आल्याचे समजते. 'ईडी'ने गेल्यावर्षी मार्चमध्ये या कंपनीच्या विविध मालमत्तांचा तपास केला होता. या मालमत्तांचा संबंध बाबा सिद्दिकी यांच्याशी आढळून आला आहे. मुंबई पोलिसांकडून नोंदवल्या गेलेल्या 'एफआयआर'ची दखल घेत 'ईडी'ने तपास सुरू केला.
मुंबई पोलिसांनी सन २०१४मध्ये न्यायालयाच्या आदेशानुसार याप्रकरणी गुन्हा नोंदवला होता. प्रकल्पपूर्तीच्या काळात म्हणजे सन २००० ते २००४पर्यंत सिद्दिकी म्हाडाचे अध्यक्ष होते.
Add new comment