लाइव न्यूज़
सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान केल्यास कारवाई होणार - जी. श्रीधर
Beed Citizen | Updated: April 6, 2018 - 3:32pm
बीड पोलिसांना "कोटपा" कायदयाचे खास प्रशिक्षण
बीड दि. ०६ ( विशेष प्रतिनिधी ) :
सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणाऱ्यांचा मोठा परिणाम जनतेच्या आरोग्यावर होत असतो. त्याचे अनुकरण केल्याने विद्यार्थी- तरुणांना व्यसनाच्या वाईट सवयी लागतात. अनेकांना तोंडाच्या कर्करोगाला बळी पडावे लागते. कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी खुल्लेआम धूम्रपान करणे कायदाने गुन्हाच आहे. तेव्हा अशा लोकांवर अंकुश ठेवण्यासही सिगारेट- तंबाखूजन्य पदार्थ विक्री कायदा ( कोटपा ) अंतर्गत कडक कारवाई केली जाणार असल्याचे बीड पोलीस अधिक्षक जी. श्रीधर यांनी सांगितले. त्याचे खास प्रशिक्षण ही बीड पोलिसांना देण्यात आले आहे. त्यांची अंमलबजावणी बीड शहरात सुरू झाली.
सार्वजनिक ठिकाणी, शाळा परिसरात खुल्लेआम सिगारेट फुंकणाऱ्यावर, तसेच तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर लगाम घालणाऱ्या सिगारेट- तंबाखूजन्य पदार्थ विक्री कायदा ( कोटपा )च्या अमंलबजावणी संदर्भात बीड पोलीस अधिक्षक कार्यालयात गुरुवारी ( दि. ५ ) एका खास प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. बीड जिल्हा पोलीस अधिक्षक जी. श्रीधर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी अतिरिक्त पोलीस अधिक्षक अजित बोराडे, संबंध हेल्थ फाऊंडेशन व्यवस्थापक देविदास शिंदे, समन्व्य श्रीकांत जाधव, नोडल ऑफिसर रामचंद्र आमटे आदी मान्यवर उपस्थित होते.
या कायदाच्या काटेकोर अंमलबजावणीकरिता भारतात कार्यरत असलेल्या संबंध हेल्थ फाऊंडेशन संस्थेतर्फे बीड पोलिसांना प्रशिक्षण देण्यात आले. कोटपा कायद्यानव्हे कोणाकोणावर कारवाई करणे शक्य आहे, शाळा परिसरात तंबाखू- सिगारेट विकणाऱ्यावर कशा प्रकारे कारवाई करता येईल अशा अनके प्रश्नांवर सखोल चर्चा या कार्यशाळेत करण्यात आली.
यावेळी बीड जिल्यातील बीड, अंबाजोगाई, परळी, शिवाजी नगर, गेवराई, तलवाडा, चकलांबा, मांजलगाव, सिरसाळा, वडवणी, केज, आष्टी, शिरूर, अंबोरा आदी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक, उप पोलीस निरीक्षक उपस्थित होते.
------------------------------ ------------------------------ ------------------------------ --
कोट : 50 टक्के कॅन्सर हे तंबाखू वापरामुळे होतात- निमेश सुमती
एकूण कॅन्सर रुग्णांपैकी सर्वात जास्त म्हणजे 50 टक्के कॅन्सर हे केवळ तंबाखू वापरामुळे होतात. कोटपा कायद्याची प्रभावी अमंलबजावणी केल्यास तंबाखूमुळे होणारे कॅन्सरचे प्रमाण कमी करता येईल असे केअरिंग फ्रेंड्सचे निमेश सुमती यांनी सांगितले.
प्रत्येक ३० सेकंदाला तंबाखू संबधीत कर्करोग रुग्णाचा मृत्यू होत असून यापैकी ९० टक्के मृत्यू हे तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे होत असल्याचे कर्करोग तज्ज्ञ डॉ. रोहन खर्डे यांनी सांगितले.
कोटपा कायदा म्हणजे काय
सिगारेट आणि अन्य तंबाखूजन्य उत्पादने ( जाहिरात आणि व्यापार विनिमय, वाणिज्य, उत्पादन, पुरवठा व वितरण प्रतिबंध कायदा ) अधिनियम २००३ हा केंद्र सरकरचा कायदा आहे. या कायद्यात एकूण पाच प्रमुख कलमे आहेत. त्यापैकी कलम-४ नुसार सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणे गुन्हा आहे. तर कलम- ७ नुसार कोणत्याही शैक्षणिक संन्स्थेच्या १०० यार्ड आवारात तंबाखूजन्य पदार्थ विक्रीवर प्रतिबंध आहे. कलम- ६ ब नुसार बालकांना किव्हा बालकांकडून तंबाखूजन्य पदार्थ विक्रीवर प्रतिबंध आहेत. या कायदयानुसार २०० रुपये चलन पावती दंड कीव्ह बाल न्याय कायदा २०१५ नुसार १ लाख रुपये आणि ७ वर्षाची शिक्षा आहे.
Add new comment