सधन कुटूंबातील सदस्याला अनुकंपा तत्वावर नियुक्ती नाकारली
बीड, (प्रतिनिधी): आर्थिक सुबत्तेच्या कारणाने हायकोर्टाने अनुकंपा तत्वावर याचिकाकर्तीला नियुक्ती देण्यास नकार दिला. तांत्रिकदृष्ट्या याचिकाकर्ती अनुकंपा तत्वावर नियुक्तीस पात्र आहे. त्यांच्या वडिलांचा शासकीय सेवेत असताना मृत्यू झाला. मुदतीत त्यांनी अर्जही दाखल केला. पण संस्थेने दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार कर्मचार्याच्या कुटूंबाची आर्थिक परिस्थिती हालाखीची नसल्याचे दिसून येते, असे मत याचिका फेटाळताना न्या. एस.व्ही. गंगापूरवाला व न्या. ए. एम. ढवळे यांच्या खंडपीठाने मांडले. उर्दू एज्युकेशन सोसायटी, अजिंठा येथे याचिकाकर्ती सीमा कौसर यांचे वडील सहशिक्षक तथा पर्यवेक्षक पदावर कार्यरत होते. कामावर असताना ते मृत झाले. याचिकाकर्तीने तीन महिन्यांत अनुकंपा तत्वावर नियुक्ती मिळण्यासाठी अर्ज केला. पण संस्थेने त्यांना नियुक्ती नाकारली. त्यानाराजीने त्यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली. अनुकंपा सेवा प्रवेशाचे साधन नाही. अनुकंपा तत्वावर नियुक्ती मागणे हे कुणाचे विहित हक्क व सेवा प्रवेशाचे साधन नाही. दिवंगत कर्मचार्याच्या कुटूंबाला आर्थिक देण्यासाठी, सक्षम करणे हा त्यामागाचा उद्देश आहे. पण या प्रकरणात याचिकाकर्तीचे कुूटूंब आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे. कुटूंबाला निवृत्ती वेतनाची भरपूर रक्कमही मिळाली असून सदस्य उच्चशिक्षीत आहेत. त्यामुळे या कुुटूंबाची आर्थिक परिस्थिती हालाखीची आहे असे म्हणता येणार नसल्याचा युक्तीवाद संस्थेतर्फे ऍड.सय्यद तौसिफ यासिन यांनी केला.
Add new comment