लाइव न्यूज़
भीमा कोरेगाव हिंसाचार : मिलिंद एकबोटेंना दुसर्या गुन्ह्यात ४ दिवसांची पोलीस कोठडी
Beed Citizen | Updated: April 4, 2018 - 3:36pm
मुंबई, (प्रतिनिदी):-भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणातील एक आरोपी मिलिंद एकबोटे यांना कोर्टाने पुन्हा एकदा झटका दिला आहे. या हिंसाचार प्रकरणातील दुसर्या एका गुन्ह्यामध्ये चौकशीसाठी त्यांना ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे सध्या येरवडा कारागृहात असलेल्या एकबोटेंना चौकशीसाठी शिक्रापूर पोलिस ठाण्यात हजेरी लावावी लागणार आहे.
भीमा कोरेगाव येथे दंगल घडवून आणल्याप्रकरणी मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे यांच्यावर प्रमुख सुत्रधार म्हणून ऍट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दंगलीची चिथावणी आणि कट कारस्थान केल्याचे दोन गुन्हे मिलिंद एकबोटे यांच्यावर अनुक्रमे पिंपरी आणि शिक्रापूर पोलिस ठाण्यात दाखल आहेत.
दंगलीला चिथावणी दिल्याप्रकरणी एकबोटे सध्या न्यायालयीन कोठडीत असून येरवडा कारगृहात त्यांची रवानगी करण्यात आली आहे. दरम्यान, आज त्यांची न्यायालयीन कोठडी संपत असल्याने त्यांना पुणे सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी शिरुर कोर्टाच्या विनंतीनुसार पुणे सत्र कोर्टाने एकबोटेंना पुन्हा ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. यासंदर्भात शिक्रापूर पोलिसांनी शिरुर तालुका न्यायालयात एकबोटेंचा ताबा मिळावा अशी विनंती केली होती.
त्यामुळे आता येरवडा कारागृहात असणार्या मिलिंद एकबोटेंना चौकशीसाठी शिक्रापूर पोलीस ठाण्यात हजेरी लावावी लागणार आहे.
Add new comment