लाइव न्यूज़
गुटखा,दारूबंदीत अपयश; व्यसनमुक्ती संमेलनावर बहिष्कार टाकणार
सौंदरमल यांचा इशारा; दारूबंदीसाठी दामिणी पथकाची स्थापना
बीड, (प्रतिनिधी):- महिलांचे संसार उध्दवस्त होत असूनही दारूबंदीचा निर्णय घेतला जात नाही. राज्यात गुटखाबंदीचे निर्देश असतांनाही त्याची योग्य अंमलबजावणी होत नाही. उलट त्यांना पोषक असे वातावरण उपलब्ध करून दिले जात आहे. गुटखा आणि दारूबंदीत अपयशी ठरलेल्या शासनाला व्यसनमुक्ती संमेलन घेण्याचा अधिकार नाही असा आरोप करत दि.२० एप्रिल रोजी बीडमध्ये होणार्या व्यसनमुक्ती संमेलनावर बहिष्का टाकण्याचा इशारा दारूबंदीसाठी लढणार्या सत्यभामा सौंदरमल यांनी दिला आहे.
बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर दारू विक्री होत आहे. हजारो संसार उध्दवस्त होत असतांनाही दारूबंदीचा निर्णय घेतला जात नाही. गावा-गावातून महिलांची मागणी होवूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. गुटखा बंदीच्या बाबतीतही तेच घडत असून बंदी असूनही त्याची अंमलबजावणी होत नसल्याने गुटख्याची सर्रास विक्री होत आहे. दारू उत्पादन करणार्या कंपन्यांना आणि गुटखा विक्रीसाठी पोषक वातावरण तयार केले जात आहे. राष्ट्रीय महामार्गावरील दारू दुकानेही पुन्हा सुरू झाली आहेत. एकंदरीत शासनाकडूनच यासंदर्भात विरोधाभास केला जात असल्याने दि.२० एप्रिल रोजी होणार्या व्यसनमुक्ती संमेलनावर बहिष्कार टाकण्याचा इशारा सौंदरमल यांनी दिला आहे. दारूबंदीचा लढाही त्यांनी तिव्र केला असून माजलगाव तालुक्यातील नित्रुड येथे आज झालेल्या बैठकीमध्ये त्यांनी दामिणी पथकाची स्थापना केली आहे. हे पथक पोलिसांच्या सोबतीने अवैध दारू विक्री रोखणार आहे. यासंदर्भात पोलिस अधिक्षकांशी चर्चा झाली असून पोलिस आणि दामिणी पथक संयुक्तरित्या अवैध दारू विक्री आणि हातभट्टी विक्री करणार्याविरूध्द कारवाईचा फास आवळणार असल्याचे सौंदरमल यांनी सांगितले.
Add new comment