लाइव न्यूज़
पेट्रोल दरवाढीवर राज ठाकरेंनी ‘पेटवली काडी’
Beed Citizen | Updated: April 4, 2018 - 3:20pm
मुंबई, (प्रतिनिधी):-पेट्रोल आणि डिझेलची गेल्या चार वर्षांतील उच्चांकी दरवाढ झाल्याने सर्वसामान्यांना दरवाढीच्या झळा सोसाव्या लागत आहेत. हाच मुद्दा पकडून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आपल्या नव्या व्यंगचित्रातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शाह यांच्यावर बोचरी टीका केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी एका सामान्य नागरिकाच्या गाडीमध्ये पेट्रोल भरताना व्यंगचित्रामध्ये राज ठाकरेंनी दाखवलं आहे, तर अमित शहा त्यांच्या शेजारी पैसे घ्यायला थांबल्याचे दाखवले आहे. याशिवाय जगात तेलाच्या किंमती खाली घसरल्या असताना सुद्धा भारतात पेट्रोल-डिझेलच्या किमतींनी आजपर्यंतचा उच्चांक गाठला आहे असा संदेश त्यांनी व्यंगचित्रावर लिहला असून अप्रत्यक्षपणे भाजपा सरकार सामान्यांना लुटत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींनी देशात उच्चांक गाठल्यामुळे सर्वसामान्यांच्या मनात रोष वाढत चालला आहे. सध्या मुंबईमध्ये प्रतिलिटर पेट्रोलचे दर ८२ तर प्रतिलिटर डिझेलचे दर ६९ रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. गेल्या काही वर्षांपासून प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आणि सोळाव्या दिवशी इंधन दर बदलाची प्रक्रिया सुरू होती. मात्र केंद्र सरकारने गेल्या वर्षीपासून दररोज इंधनाचे दर बदलाचे धोरण स्वीकारले. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून होत असलेल्या या बेसुमार दरवाढीविरोधात जनतेतून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. आधीच जिवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीने हैराण झालेल्या जनतेला पेट्रोल- डीझेल दरवाढीचा दणका बसला आहे. त्यातून दर महिन्याच्या खर्चाचे बजेट बिघडले आहे. दरवाढ तत्काळ कमी करून जनतेला दिसाला देण्याची मागणी होत आहे.
Add new comment