लाइव न्यूज़
पिंपळनेर तालुका निर्मितीची मागणी; आ.क्षीरसागर, आ.पंडितांचा पाठिंबा
बीड, (प्रतिनिधी):- तालुक्याच्या मागणीवरुन आक्रमक झालेल्या पिंपळनेरकरांनी आज सकाळपासुन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या मांडला असुन सर्वांनी एकत्र येऊन एकीची वज्रमुठ आवळली आहे. ‘आता नाही तर कधीच नाही’ अशी हाक देत एकत्र आलेल्या पिंपळनेरवासियांच्या आंदोलनाला सर्व स्तरातून पाठिंबा मिळत आहे. आ.जयदत्त क्षीरसागर, आ.अमरसिंह पंडित यांनी उपोषणस्थळी भेट देवून तालुका मागणीच्या आंदोलनाला पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले. दरम्यान आंदोलनाच्या पार्श्वभुमीवर पिंपळनेरकरांनी आपले सर्व व्यवहार बंद ठेवून सक्रिय सहभाग नोंदवला.
बीड तालुक्यातील पिंपळनेरला तालुक्याचा दर्जा द्यावा या मागणीसाठी तेथील नागरीकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरु केले आहे. अनेक वर्षांपासुनच्या आग्रही मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. तालुकानिर्मितीच्या प्रश्नावरुन सर्वांनी एकत्र येऊन वेळोवेळी जनआंदोलन, रास्तारोको, उपोषण, गावबंद अशी आंदोलने केली. स्वातंत्र्यदिनी स्वातंत्र्य सैनिकांनी केलेले उपोषणही लक्षवेधी ठरले होते. त्या उपोषणातही पिंपळनेर ग्रामस्थांनी सक्रिय सहभाग नोंदवला होता. त्यानंतर आता पुन्हा तालुकानिर्मितीच्या मागणीवरुन पिंपळनेरवासियांनी एकीची वज्रमुठ आवळली असुन आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करत प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले. या आंदोलनात गावातील सर्व पक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक, पत्रकार यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. आ.जयदत्त क्षीरसागर, आ.अमरसिंह पंडित यांनीही उपोषणस्थळी भेट देवून पाठिंबा दर्शविला.
Add new comment