लाइव न्यूज़
यूपीचं योगी सरकार डॉ. आंबेडकरांच्या नावात ‘रामजी’ जोडणार!
Beed Citizen | Updated: March 29, 2018 - 3:03pm
लखनौ : उत्तर प्रदेशातील सर्व राजकीय रेकॉर्डमध्ये आता भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या नावात ‘रामजी’ जोडलं जाणार आहे. उत्तर प्रदेश सरकारने ‘डॉ. भीमराव आंबेडकर’ यांचं नाव बदलून ‘डॉ. भीमराव रामजी आंबेडकर’ करण्यासाठी, सर्व विभाग आणि अलाबाहाद-लखनौमधील हायकोर्टाच्या सर्व खंडपीठांना आदेश दिले आहेत.
संविधानाच्या पानांमध्ये बाबासाहेब यांची डॉ. भीमराव रामजी आंबेडकर नावाने स्वाक्षरी आहे. राज्यपाल राम नाईक यांनी डिसेंबर २०१७ मध्ये ह्या अभियानाला सुरुवात केली होती. राम नाईक यांनी पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि महासभेला पत्र लिहून आंबेडकरांच्या नावाचा योग्य उच्चार आणि योग्य नाव लिहिण्याकडे लक्ष वेधलं होतं, असं बाबासाहेब डॉ. भीमराव आंबेडकर महासभेचे संचालक डॉ. लालजी प्रसाद निर्मल यांनी सांगितलं.
लालजी प्रसाद म्हणाले की, मुख्य मुद्दा असा आहे की, त्यांच्या नावाचा योग्य उच्चर व्हायला हवा. इंग्लिशमध्ये त्यांच्या नावाचं स्पेलिंग बरोबर आहे. पण हिंदीत त्यांचं नाव योग्य पद्धतीने लिहिलं जावं. ‘अंबेडकर’ न लिहिता ‘आंबेडकर’ लिहायला हवं. तर रामजी त्यांच्या वडिलांचं नाव होतं. महाराष्ट्रीय आणि भारतीय परंपरेत मुलाच्या नावानंतर वडिलांचं नाव लिहितात.
सामान्य प्रशासन विभागाचे प्रमुख सचिव जीतेंद्र कुमार यांनी याबाबतची सरकारी अधिसूचना जारी केली आहे. यासाठी संविधानातील आठव्या अनुच्छेदाच्या मूळ प्रतीचा आधार बनवण्यात आलं आहे. इथे बाबासाहेबांची स्वाक्षरी ‘डॉ. भीमराव रामजी आंबेडकर’ अशी आहे.
दरम्यान, १४ एप्रिल रोजी आंबेडकर जयंतीही आहे. त्यामुळे जयंतीआधी सरकारचा हा आदेश महत्त्वपूर्ण आहे.
Add new comment