लाइव न्यूज़
अण्णा हजारे आज उपोषण सोडण्याची शक्यता, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना
Beed Citizen | Updated: March 29, 2018 - 2:47pm
नवी दिल्ली, (वृत्तसंस्था):- जनलोकपाल आणि शेतकर्यांच्या मागण्यांसाठी उपोषणाला बसलेले ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रकृती खालावत चालली आहे. गुरुवारी अण्णांच्या मागण्यांवर सकारात्मक विचार होऊन त्यांचे उपोषण सोडवण्याचा प्रयत्न केंद्र आणि महाराष्ट्र सरकारकडून सुरु आहे. अण्णांच्या प्रकृतीची चिंता असल्याने कोअर टीमने सरकारशी वाटाघाटी सुरू केल्या आहेत. कोअर टीमने सकारात्मक प्रतिसाद दिल्याने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दुपारी एकच्या सुमारास दिल्लीला रवाना झाले. त्यामुळे अण्णांचे उपोषण आज सायंकाळी चारपर्यंत सुटू शकते अशी माहिती मिळत आहे.
अण्णांच्या आंदोलनाचा आजचा सातवा दिवस आहे. या काळात अण्णांचे ५ किलो ८०० ग्रॅम इतके वजन कमी झाले आहे. बुधवारी सायंकाळी अण्णांची प्रकृती बिघडली. सुरूवातीला अण्णांचा ब्लडप्रेशर वाढला व नंतर खालावला. त्यामुळे अण्णांच्या प्रकृतीत सातत्याने चढउतार होत आहे. ८० वर्षीय अण्णांना उपोषणामुळे मल्टि ऑरगन फेल होण्याचा धोका असल्याचे मत त्यांच्यावर २४ तास लक्ष ठेऊन असलेल्या डॉक्टरांनी म्हटले आहे.
डॉक्टर म्हणाले प्रकृती खालावत चालली
- अण्णा हजारे यांच्या उपोषणाचा आज सातवा दिवस आहे. बुधवारपासून अण्णांची प्रकृती खालावत चालली आहे. यामुळे आंदोलक आणि कोअर कमिटीमध्ये चिंतेचे वातावरण आहे. गुरुवारी कोअर कमिटीने तातडीची बैठक बोलावली आहे. दरम्यान, अण्णांच्या प्रकृतीवर नजर ठेवून असलेल्या डॉक्टरांचे म्हणणे आहे, की आज उपोषण सोडणे गरजेचे आहे, अन्यथा प्रकृती आणखी खालवण्याची शक्यता आहे.
पीएमओ कडून सुधारित मसुदा
- जनलोकपाल, शेतकर्यांचे प्रश्न आणि निवडणूक प्रक्रियेत महत्त्वाचे बदल या मागण्यांसाठी २३ मार्च शहीद दिनापासून अण्णांनी दिल्लीतील रामलीला मैदानावर उपोषणाला सुरुवात केली.
- गेल्या सात दिवसात अण्णांच्या आंदोलनाची केंद्र सरकारकडून योग्य दखल घेतली गेली नाही. महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे अण्णांच्या संपर्कात आहेत. तेच एकमेव मंत्री आहेत जे अण्णा आणि केंद्र सरकारमध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र त्यांच्या शिष्टाईला अद्याप यश आलेले नाही.
Add new comment