लाइव न्यूज़
बीडमध्ये महिला पुन्हा उपोषणस्थळी प्रसुत
बीड, (प्रतिनिधी):- पीटीआर नक्कल व घरकुल मंजुरीसाठी तीन दिवसांपासुन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसलेली महिला मध्यरात्री उपोषणस्थळीच प्रसुत झाल्याने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. प्रशासनाच्या दारातच उपोषणार्थी महिलेने एका मुलीला जन्म दिला असुन याबाबत उपोषणार्थी अन्य महिलांनी ही बाब तेथीलच एका पोलिस कर्मचार्याला सांगितली असता ‘मी काय करु’ असे उत्तर त्यांच्याकडून मिळाल्याचे महिलेच्या कुटूंबियांनी सांगितले. दरम्यान चार दिवसापुर्वीच वासनवाडी येथील वस्तीवरील उपोणार्थी महिला त्याच ठिकाणी प्रसुत झाली होती. त्यानंतर पुन्हा त्याच घटनेची पुनरावृत्ती झाली आहे.
बीड येथून जवळच असलेल्या मौजे वासनवाडी येथील कविता अप्पाराव पवार व इतरांनी दि.२३ मार्च पासुन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोेषण सुरु केलेले आहे. पारधी समाजातील दहा व्यक्तींना राहण्यासाठी वासनवाडी शिवारात जागा मिळावी. पीटीआर नक्कल देण्यात यावी आणि घरकुल मंजुरीसाठी संबंधितांना आदेश द्यावेत या मागणीसाठी उपोेषण सुरु होते. त्यामध्ये कविता आप्पाराव पवार या गर्भवती महिलेचाही समावेश होता. मध्यरात्री कविता पवार यांची उपोषणस्थळीच प्रसुती झाली. त्यांनी एका मुलीला जन्म दिला असुन प्रशासन या प्रकाराविषयी अनभिज्ञ आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यापुर्वी सदर महिलेने विभागीय आयुक्त कार्यालयासमोरही आंदोलन केले होते. तीन दिवसांपासुन उपोषणस्थळी बसुनही कोणीच दखल घेतली नाही. परिणामी उपोषणार्थी महिलेची प्रसुती झाल्याने खळबळ उडाली आहे.दरम्यान कविता पवार यांनी कालच एका खाजगी रुग्णालयात तपासणी केली होती. मात्र खर्च जास्त असल्याने त्यांच्या कुटूंबियांनी कविता पवार यांना पुन्हा उपोषणस्थळी आणल्यानंतर मध्यरात्री त्यांची प्रसुती झाली. प्रसुतीनंतरही त्यांनी नवजात मुलीसह उपोषण सुरुच ठेवले आहे.
Add new comment