लाइव न्यूज़
कॉंग्रेसची मोटबांधणी; विधानसभेच्या जागासंदर्भात मुंबईत बैठक
Beed Citizen | Updated: March 26, 2018 - 3:15pm
पुढील आठवड्यात होणार्या बैठकीत पदाधिकार्यांशी चर्चा; बीडमधून ३ जागांवर दावा
बीड, (प्रतिनिधी):- आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने कॉंग्रेसने मोट बांधणी सुरु केली आहे. आघाडीची घोषणा झाल्यानंतर कॉंग्रेसमध्ये पक्षांतर्गत हालचालींना वेग आला असुन राज्यातील आजी माजी आमदार-खासदार, पदाधिकारी यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदेशाध्यक्ष खा.अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत दि.२ एप्रिल रोजी मुंबईत होणार्या बैठकीमध्ये मतदार संघांबाबत चर्चा होणार असल्याचे समजते. दरम्यान बीड जिल्ह्यातील कॉंग्रेसही भाजपसोबत दोन हात करण्यास सज्ज झाली असुन पक्षाच्या पदाधिकार्यांनी परळीसह बीड आणि आष्टी विधानसभा मतदार संघाची मागणी केली आहे. एवढेच नव्हे तर केज मतदार संघासाठीही कॉंग्रेसची चाचपणी सुरु असुन सहा पैकी तीन जागांवर कॉंग्रेसचा दावा असल्याने जिल्ह्यात आघाडीचा फिप्टी-फिप्टी फार्म्युला होण्याची शक्यता सुत्रांनी वर्तविली आहे.
बीड जिल्हा कॉंग्रेसने आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. राष्ट्रवादीसोबत आघाडीची घोषणा झाल्यानंतर पक्षांतर्गत हालचालींना वेग आला आहे. महिनाभरापुर्वी बीडमध्ये झालेल्या कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीरासाठी आलेल्या श्रेष्ठींसमोर पदाधिकार्यांनी परळीसह बीड आणि आष्टी विधानसभा मतदार संघाची मागणी केली आहे. जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी यांनीही कॉंग्रेसने तीन जागांवर दावा केल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर आघाडीची घोषणा झाल्याने आता राज्यात मतदारसंघ मागणीबाबत दावे-प्रतिदावे होण्याची शक्यता असुन त्याच दृष्टीने चर्चा करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष खा.अशोक चव्हाण यांनी दि.२ एप्रिल रोजी मुंबईत बैठक बोलावली आहे. राज्यातील आजी-माजी खासदार, आमदार यांच्यासह पदाधिकार्यांसोबत चर्चा करुन मतदारसंघ निहाय आढावा घेण्यात येणार आहे. या बैठकीतही जिल्हा कॉंग्रेस पदाधिकार्यांकडून परळी, बीडसह आष्टी विधानसभा मतदार संघावर दावा केला जाणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. या तीन मतदार संघाशिवाय केज मतदार संघाच्या बाबतीतही जिल्हा कॉंग्रेसकडून चाचपणी सुरु आहे. बीडसह अन्य दोन अशा तीन जागांचा दावा कॉंग्रेसकडून केला जाणार असल्याने आघाडीत फिप्टी-फिप्टी फार्म्युल्याचा वापर होण्याची शक्यता असुन त्यावर मुंबईतील बैठकीत चर्चा होणार असल्याचे समजते.
Add new comment