लाइव न्यूज़
बीडमधील अल्पसंख्यांक मुलीच्या वस्तीगृहप्रश्नी आ.क्षीरसागर-मेटेंमध्ये श्रेयाची लढाई
Beed Citizen | Updated: March 25, 2018 - 4:34pm
श्रेयवादाचा डंका नकोय; प्रत्यक्ष काम हवयं!
अल्पसंख्याक समाजातील नागरिकांची मागणी; खासबागेतील जागा पालिकेने हस्तांतरीत करावी
बीड, (प्रतिनिधी):- अल्पसंख्यांक मुलींच्या वस्तीगृह प्रश्नी दोन नेत्यांमध्ये श्रेयवादाची लढाई सुरु झाली आहे. भाजपच्या मंत्र्यांसोबत बैठकांचा धडाका सुरु असुन त्या माध्यमातून प्रश्न मार्गी लावल्याचे सांगितले जात आहे. सन २०१० मध्ये अल्पसंख्यांक मुलींच्या वस्तीगृहाला मंजुरी मिळालेली आहे. आतापर्यंत शांत बसलेली नेतेमंडळी अचानकपणे या प्रश्नावरुन श्रेयवाद करु लागली आहे. आ.जयदत्त क्षीरसागर आणि सत्तेत सहभागी असलेल्या आ.विनायक मेटे यांच्याकडून या प्रश्नावरुन सुरु असलेल्या श्रेयवादाची चर्चा लोकांमध्ये होवू लागली आहे. त्यात भर म्हणून की काय? भाजप नेते सलीम जहॉंगीर यांनीही पत्रकबाजी करत हा प्रश्न पालकमंत्री पंकजा मुंडेच मार्गी लावतील असे स्पष्ट केले आहे. दरम्यान श्रेयवादाची लढाई आणि भाजप नेत्यांचे आश्वासन पाहता श्रेयवादाचे ढोंग नकोय तर प्रत्यक्ष वस्तीगृहाचं काम हवयं अशी अपेक्षा अल्पसंख्यांक समाजातील सुजान नागरिकांमधुन व्यक्त होवू लागली आहे.
बीड जिल्ह्यातील अल्पसंख्यांक मुलींच्या शिक्षणाची सोय शहराच्या ठिकाणी व्हावी यासाठी २०१० मध्ये वस्तीगृहाला मंजुरी मिळालेली आहे. आठ वर्ष उलटूनही हा प्रश्न आहे तिथेच आहे. पुर्वीच्या आणि आताच्या सत्ताधार्यांनी केवळ कागदी घोडे नाचवले. पालिकेने वस्तीगृहासाठी जागा देण्याचीही तसदी घेतली नाही. परिणामी प्रशासनाने जागाच उपलब्ध नसल्याचा अहवाल शासनाला पाठवला. त्यामुळेच आजपर्यंत हा प्रश्न मार्गी लागलेला नाही. मात्र दोन दिवसांपासुन अल्पसंख्यांक मुलींच्या वस्तीगृहाच्या प्रश्नावरुन श्रेयवादाची लढाई सुरु आहे. दोन आमदारांमध्ये सुरु असलेल्या श्रेयवादात भाजप नेत्यांनीही उडी घेतली आहे. कामाच्या संदर्भात अजुन कुठलीच हालचाल नाही. प्रशासकीय पातळीवर अजुनही जागेबाबतचा प्रश्न पुढे सरकलेला नाही.असे असतांना केवळ श्रेयवादच पहायला मिळत आहे. पालिकेने खासबागेतील जागा प्रशासनाकडे हस्तांतरीत करावी. दोन्ही नेत्यांसह ज्यांना कोणाला श्रेय घ्यायचे आहे त्यांनी आधी कामाला सुरुवात करावी अशी अपेक्षाही व्यक्त होत आहे.
सलीमभाई, पत्रकबाजी नकोय
दोन्ही ताईंना सांगून नारळच फोडा!
बीडमधील अल्पसंख्यांक समाजातील मुलींच्या वस्तीगृहप्रश्नी आ.जयदत्त क्षीरसागर आणि आ.विनायक मेटे यांनी पुढाकार घेताच सत्तेत आल्यापासुन या प्रश्नी शांत बसलेले भाजप नेते सलिम जहॉंगीर यांनी पत्रकबाजी सुरु केली आहे. समाजाला पत्रकबाजीचा आणि आश्वासनांचा विट आलेला आहे. त्यामुळे सलीम जहॉंगीर यांनी पत्रकबाजी करण्याऐवजी दोन्ही ताईंना सांगून प्रत्यक्ष कामाचा नारळ फोडावा अशी अपेक्षा नागरिकांतून व्यक्त होत आहे.
Add new comment