लाइव न्यूज़
अंगणवाडीताईंचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचा जाहिर सत्कार करणार -दिलीप भोसले
Beed Citizen | Updated: March 23, 2018 - 2:57pm
बीड (प्रतिनिधी) महाराष्ट्रातील तब्बल दोन लाख अंगणवाडीताईंच्या प्रश्नावर दोन दिवस सभागृह तहकुब करून अंगणवाडीताईंचे प्रश्न मंजूर करून घेतले व भाऊ म्हणून अंगणवाडीताईंच्या पाठिशी उभे राहिले. यामुळे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी संघर्ष सेविका, मदतनिस, कर्मचारी संघटनेच्या वतीने अधिवेशनानंतर दिनांक निश्चत करून विरोधीपक्षनेते आमदार धनंजय मुंडे यांचा बीड येथे जाहिर सत्कार व त्यांचे आभार व्यक्त करण्यात येणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष दिलीप भोसले यांनी दिली.
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, पुरवठामंत्री गिरीष बापट, खासदार सुप्रिया सुळे, आमदार विनायक मेटे, महसूल चंद्रकांत पाटील तसेच माजी आमदार, खासदारांना भेटून अंगणवाडी कर्मचार्यांना शासकीय सेवेत घ्या या मागणीसाठी सभागृहात आवाज उठवावा याचे निवेदन संघटनेच्या वतीने देऊन सतत पाठपुरावा केला. दुसर्या संघटनेने मानधना व्यतिरिक्त कुठलीही मागणी केली नाही. आजपर्यंतच्या इतिहासात अंगणवाडीताईंबद्दल कुठल्याही राजकीय नेतृत्वाने अथवा पक्षाने प्रेम दाखविले नव्हते. सभागृहात अंगणवाडीताईंच्या प्रश्नावर कधीही व्यापक चर्चा झाली नाही. संघटनेच्या वतीने आम्ही विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना दोन-तीन वेळेस भेटून अंगणवाडीताईंच्या व्यथा मांडल्या. नागपूर अधिवेशनामध्ये आमदार अमरसिंह पंडित व आमदार प्रकाश गजभिये यांनी तारांकीत प्रश्न उपस्थित केला होता. धनंजय मुंडे यांनी या अधिवेशनात अंगणवाडीताईंचे प्रश्न मार्गी लावण्यासंदर्भात व शासकीय सेवेत घेण्यासंदर्भात अधिवेशनात आवाज उचलणार असल्याचे अभिवचन दिले होते. हे अभिवचन मुंडे यांनी तंतोतंत पूर्ण करून अंगणवाडीताईं, एसटी कामगारांच्या प्रश्नांना वाचा फाेडून सभागृहात सरकारला धारेवर धरले आणि प्रश्न सोडविण्यास भाग पाडले. मेस्मा सारखा जाचक कायदा धनंजय मुंडे यांच्यामुळे सरकारला मागे घ्यावा लागला. यामुळे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी संघर्ष सेविका, मदतनिस, कर्मचारी संघटनेच्या वतीने विरोधीपक्षनेते आमदार धनंजय मुंडे यांचा सत्कार अधिवेशन झाल्यानंतर बीड येथे करण्यात येणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष दिलीप भोसले यांनी सांगितले.
Add new comment