लाइव न्यूज़
वनदिनाच्या पुर्वसंध्येलाच ऍपल बोरीच्या २२ झाडांची कत्तल
माजलगावच्या पात्रुड शिवारातील घटना; अडीच लाखांचे झाडे तोडून चोरुन नेले
बीड, (प्रतिनिधी):- शेतात लावलेल्या ऍपल बोरीच्या २२ झाडांची कत्तल करुन चोरुन घेऊन गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी अडीच लाखांची झाडे तोडल्याच्या तक्रारीवरुन एका विरुद्ध माजलगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान आज सर्वत्र जागतिक वनदिन साजरा करुन झाडाच्या संवर्धनाचा संदेश दिला जात असतांनाच वनदिनाच्या पार्श्वभुमीवर हा प्रकार घडल्याने संताप व्यक्त होत आहे.
माजलगाव तालुक्यातील पात्रुड शिवारातील शेत सर्व्हे नं.९६, १००, ९१ या ठिकाणी शिवप्रताप आसाराम भुतडा (४०) रा.शाहुनगर, माजलगाव यांनी ऍपल बोरीचे झाडे लावले आहेत. दि.१६ मार्च रोजी रात्रीच्या सुमारास आरोपीनीं त्यांच्या शेतामध्ये अनाधिकृतरित्या प्रवेश करुन भुतडा यांच्या शेतातील ऍपल बोरीच्या २२ झाडांची कत्तल केली. या प्रकरणात काल दुपारी शिवप्रताप भुतडा यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन ऍपल बोरीच्या अडीच लाख रुपये किंमतीची झाडे तोडून चोरून घेऊन गेल्या प्रकरणी गंगाभिषण रामभाऊ जंगले यांच्या विरुद्ध माजलगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहा.फौजदार शेख खदीर हे करीत आहे.
Add new comment