लाइव न्यूज़
नरेगातील याद्यांकडे दुर्लक्ष; ग्रा.पं.चे ठरावही परस्पर बदलल्याने कनिष्ठ सहाय्यक निलंबीत सीईओ येडगेंची कारवाई; गेवराई पंचायत समितीत खळबळ
बीड, (प्रतिनिधी):- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (नरेगा) अंतर्गत प्राप्त संचिकांची तपासणी करुन पात्र, अपात्र लाभार्थ्यांची संगणकीकृत याद्या तयार न करणार्या ग्रामसेवकाविरुद्ध मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. गेवराई पंचायत समितीतील कनिष्ठ सहाय्यक हिवाळे यांना तडकाफडकी निलंबित केल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान या संदर्भात पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे मराठवाडा सचिव अनिल तुरुकमारे यांनी बीडसह विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन करुन नरेगातील गैरप्रकार चव्हाट्यावर आणला होता.
गेवराई येथील पंचायत समिती कार्यालयातील नरेगा योजनेतर्ंगत प्राप्त संचिकांची तपासणी करुन पात्र व अपात्र लाभार्थ्यांच्या संगणीकृत याद्या तयार करण्याबाबत गटविकास अधिकार्यांनी वेळोवेळी सूचना देवूनही कनिष्ठ सहाय्यक हिवाळे यांनी याद्या तयार केल्या नाहीत. सिंचन विहिरीच्या प्राप्त संचिकेतील ग्रामपंचायतचे मुळ ठराव परस्पर बदलून नव्याने ठराव संचिकेस संलग्न करुन कामकाजात अनियमितता करणे, कार्यभार हस्तांतरण न करणे तसेच प्रशासकीय कामकाजात हलगर्जीपणा व कर्तव्यात कसुर केल्याचा ठपका ठेवत मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी कनिष्ठ सहाय्यक हिवाळे यांना तडकाफडकी निलंबित केले आहे. निलंबन काळात त्यांना आष्टी पंचायत समिती मुख्यालय देण्यात आले आहे. या प्रश्नी पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे अनिल तुरुकमारे यांनी सातत्याने पाठपुरावा करुन नरेगातील अनियमितता चव्हाट्यावर आणली होती. तुरुकमारे यांच्या आंदोलनाला कारवाईच्या माध्यमातून यश मिळाले आहे.
Add new comment