पंधरा हजार बिल असलेल्यांचे कनेक्शन तोडले मात्र तीस हजार बाकी असलेल्या ग्राहकाला पायघड्या

बीड, (प्रतिनिधी):- विज कंपनीच्या पथक क्रमांक ३ मधील लाईनमन निर्मळ यांचा जातीयवादी चेहरा उघडा पडला आहे. चांदणी चौकातील एकाच डीपीवरुन वीज तोडणी असलेल्या दोन ग्राहकांना वेगवेगळा न्याय दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एका मुस्लिम कुटूंब ग्राहकाकडे पंधरा हजाराचे बिल थकल्याने त्यांचे कनेक्शन तोडले असुन अन्य एका ग्राहकाकडे २०१२ पासुन ३० हजार बाकी असतांना त्यांच्यावर कसलीही कारवाई केली नाही. या प्रकरणी संबंधीत जातीयवाद करुन तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणार्‍या लाईनमन निर्मळ यांच्यावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी एमआयएमचे शेख अमर यांनी केली आहे.
बीड शहरातील विज वितरण कंपनीतील बार्शी नाका येथील पथक क्रमांक ३ मधील लाईनमन निर्मळ यांनी दोन दिवसांपुर्वी त्या भागातील चांदणी चौकात विज ग्राहकांवर कारवाई केली. बद्रुशहा मंगलशहा (ग्राहक क्रं.५७६०१०३४२५३७) या ग्राहकाकडे १५६४० रुपये थकबाकी होती. निर्मळ यांनी त्यावर कारवाई करत विज कनेक्शन तोडून मिटर, वायर, जप्त केले तर त्याच डीपीवर आणि त्याच पोलवर असलेले ग्राहक क्र.५७६०१०३७९२७४ यांच्याकडे २०१२ पासुन आजपर्यंत ३०९६० रुपये विज थकबाकी असतांना त्या ग्राहकाकडे दुर्लक्ष केले. यावरुन निर्मळ हे कारवाई करतांना जातीयवाद करत असल्याचे स्पष्ट होत आहे. त्या ग्राहकासह ढोरवाडा, चांभारवाडा, परिसरासह अन्य ठिकाणीही अशाच स्वरुपाचा भेदभाव दाखवणारी कारवाई करत आहे. निर्मळ यांच्या विरुद्ध सातत्याने तक्रारी केल्या जातात यापुर्वी एका ग्राहकाने त्यांच्याच त्रासाला कंटाळून विष प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केला होता. तरी ही निर्मळ यांच्यावर कोणतीच कारवाई झाली नाही. आता तर त्यांच्याकडून भेदभाव ठेवून कारवाई केली जात असुन निर्मळ यांना तातडीने निलंबित करावे अशी मागणी एमआयएमचे  शेख अमर यांनी केली असुन वरिष्ठांनी कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा ईशारा शेख अमर यांनी दिला आहे.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.