‘मोदीमुक्त भारत’ जरा जास्तच झाले, राज ठाकरेंनी स्तर पाहून बोलावे – आशिष शेलार
‘मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेली 'मोदीमुक्त भारता'ची घोषणा भाजपच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे. 'ज्यांना राज्यातील जनतेने 'रोजगारमुक्त' केलं त्यांनी 'मोदीमुक्त भारता'ची मुक्ताफळे उधळू नयेत,' अशी टीका भाजपचे मुंबई अध्यक्षआशिष शेलार यांनी केली आहे. 'मोदीमुक्त भारत' जरा जास्तच झालं. राज यांनी त्यांचा स्तर पाहून बोलावं,' असा सल्लाही त्यांनी दिला.
प्रसारमाध्यमांशी बोलताना आशिष शेलार यांनी राज ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले. 'पूर्वी राज यांच्या भाषणावर बाळासाहेब ठाकरे यांचा प्रभाव दिसायचा, आता त्यांच्यावर शरद पवार यांचा प्रभाव दिसून येतो,' असा टोला शेलार यांनी हाणला. 'विधानसभा ‘मनसेमुक्त’ झाली, मुंबई महापालिकेतील उरले-सुरलेले नगरसेवकही पळून गेले. त्यामुळे महाराष्ट्रातील जनता आता यांच्यावर विश्वास ठेवणार नाही, असा दावाही त्यांनी केला.
दरम्यान, भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनीही राज यांच्यावर सडकून टीका केली. पराभूत मानसिकतेतून राज यांची केविलवाणी धडपड सुरू आहे. 'मोदीमुक्त भारत' करण्याआधीच महाराष्ट्राने त्यांना 'मनसेमुक्त' केल्याची टीका भातखळकर यांनी केली.
ज्यांनी यांचे नगरसेवक पळविले, त्यांच्यावर टीका केली नाही आणि 'मोदीमुक्त भारता'ची मुक्ताफळे उधळली जात आहेत. 'मोदीमुक्त भारत' करण्यासाठी यांच्याकडे नेते तरी आहेत का? असा सवालही त्यांनी केला. दरम्यान, '२०१९ साली भारताला तिसऱ्या स्वातंत्र्याची गरज आहे. मोदीमुक्त भारत करा,' असं आवाहन राज यांनी शिवाजी पार्क येथील जाहीर सभेत रविवारी केलं होतं.
Add new comment