लाइव न्यूज़
३८ कोटींच्या गुंतवणूकीत ठेवीदारांचा जीव गुंतला! जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन
बीड, (प्रतिनिधी):- खाजगी कंपन्यांकडून गुंतवणूकीच्या नावाखाली झालेले गैरप्रकार चर्चेत असतांनाच आणखी एका कंपनीकडून बीडकरांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ठेवीची मुदत संपून तीन वर्ष झाले तरी ठेवीचे पैसे परत न मिळाल्याने ठेवीदारांनी एचबीएन डेअरीज ऍण्ड अलाईड लि.कंपनीविरुद्ध आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. या कंपनीत २८ हजार लोकांनी तब्बल ३८ कोटी ५० लाख रुपयांची गुंतवणूक केली आहे.
बीड येथे आज दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठेवीदारांनी लाक्षणिक धरणे आंदोलन केले. जिल्हाधिकार्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, एचबीएन डेअरीज ऍण्ड अलाईड लि.शाखा कार्यालय सिद्धीविनायक बिल्डींग पहिला मजला जालना रोड, बीड ( मुख्य कार्यालय विकासपुरी, नवीदिल्ली) येथे जिल्ह्यातील २८ हजार लोकांनी ३८ कोटी ५० लाख रुपयांच्या रक्कमेची आरडी व एफडीची गुंतवणूक केलेली आहे. सदरील ठेवीची मुदत संपुन तीन वर्ष झाले तरी आम्हाला ठेवीचे पैसे मिळालेले नाहीत. सदरील कंपनीस रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ट्रबल फिनलेस लि. या नावाने नॉन बँकींग सेक्टरमध्ये काम करण्याची परवानगी दिलेली होती. सदरील कंपनीने देशभरात कार्यालय सुरु केली होती. कंपनीने मार्च २०१५ पर्यंत ठेवीदारांचे पैसे परत केले नंतर मात्र भारत सरकारने २०१५ मध्ये नॉन बँकींग सेक्टरमधील काही कंपनीचे व्यवहार बंद केल्याने सदरील कंपनीचेही व्यवहारही बंद झाले. त्यामुळे एप्रिल २०१५ पासुन ठेवीदारांना पैसे परत मिळाले नसल्याचे तक्रारीत नमुद करण्यात आले आहे. या संदर्भात ठेवीदारांनी सेबी (सेक्युरिटी ऍण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया) कार्यालयात तक्रार केली असुन सेबीने कंपनीस लोकांच्या ठेवीचे पैसे परत देण्याचे फेब्रुवारी २०१५ मध्ये आदेशित केले होते. कंपनीने या आदेशास सॅट कायालयात आव्हान दिल्यानंतर त्याठिकाणी झालेल्या युक्तीवादात सॅट कार्यालयानेही जून २०१७ मध्ये कंपनीची स्थावर मालमत्ता ताब्यात घेऊन सेबी कार्यालयाकडे हस्तांतरीत केली. सदरील मालमत्ता विकून सहा महिन्यात ठेवीदारांचे पैसे देण्याचे आदेश सेबी कार्यालयास दिलेले आहे. सहा महिन्याची मुदत डिसेंबर २०१७ मध्ये संपलेली असुनही सेबीने कंपनीची एकही मालमत्ता न विकल्याने अद्यापपर्यंत ठेवीदारांना पैसे मिळालेले नाही. सेबीने कंपनीची मालमत्ता तात्काळ विकून ठेवीची रक्कम परत द्यावी अशी मागणी यावेळी जिल्हाधिकार्यांकडे करण्यात आली आहे. यावेळी त्रिंबक संतराम खाकरे, मोहन दादाराव वाघमारे यांच्यासह एचबीएन कंपनीत गुंतवणूक केलेले शेकडो ठेवीदार आंदोलनात सहभागी झाले होते
Add new comment