लाइव न्यूज़
जिल्हा प्रशासनाच्या संवेदना गोठल्या शासनाचीही लक्तरे वेशीला! पाच दिवसांपासून उपोषणकर्त्यांकडे डूंकुनही पाहिले नाही
महिलेची उपोषणस्थळीच प्रसुती
बेटी बचावच्या बॅनरजवळच मुलीची अवेहलना
बीड, (प्रतिनिधी):-न्याय हक्काच्या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसलेल्या आंदोलनकर्त्यांकडे प्रशासन आणि संबंधीत विभाग नेहमीच दुर्लक्ष करतो. याची प्रचिती आज पुन्हा एकदा आली असून पाच दिवसांपासून कुटुंबियांसह ठिय्या मांडून बसलेल्या उपोषणकर्त्यांकडे एकाही सरकारी बाबूने डूंकुन पाहिले नाही. उपोषणकर्त्यांमध्ये एका गर्भवती महिलेचाही समावेश होता. रात्री उशिरा सदरील महिला सुरेखा शिवाजी पवार (वय२४) यांची उपोषणस्थळीच प्रसुती होवून त्यांनी एका गोंडस मुलीला जन्म दिला. दरम्यान या प्रकाराने खळबळ उडाली असून राज्यभर बेटी बचाव, बेटी पढावचा डंका पिटणार्या शासनाची लक्तरे वेशीला टांगली गेली असून प्रशासनाचाही संवेदना गोठल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी महिला उपोषणार्थी प्रसुत झाली त्याच ठिकाणी जाणीव जागृती अभियानांतर्गत बेटी बचाव, बेटी पढावचा संदेश देणारे बॅनर झळकत असून तिथेच एका मुलीची झालेली अवेहलना कमालीचा विरोधाभास दाखवणारी आहे.
बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वासनवाडी येथील सुबराव मोतीराम काळे व इतर १६ कुटुंब दि.१५ मार्च पासून बेमुदत उपोषणाला बसले आहेत. वासनवाडी (ता.बीड) शिवारातील पारधी वस्तीवरील पंतप्रधान घरकुल आवास योजनांतर्गत पात्र लाभार्थ्यांना घरे बांधून देण्याचे आदेश देण्यात यावेत यामागणीसाठी सुरू असलेल्या १६ कुटुंबाच्या उपोषणाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले. उपोषणाचा आज पाचवा दिवस असूनही एकाही सरकारी बाबूने किंवा संबंधीत विभागाने उपोषणकर्त्यांच्या प्रश्नाची दखल घेतली नाही. उपोषणासाठी बसलेल्या कुटुंबातील एका महिलेची रात्री उशिरा उपोषणस्थळीच प्रसुती झाली असून महिलेने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. प्रसुती नंतरही सदरील महिलेने नवजात मुलीसह उपोषणस्थळीच थांबण्याचा निर्णय घेतला असून जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत उठणार नाही असा आक्रमक पावित्रा कुटुंबांनी घेतला आहे. दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणस्थळीच महिलेची प्रसुती झाल्याने शासनासह प्रशासनाची लक्तरे वेशीला टांगली गेली. उपोषणकर्त्यांनी उपोषणास बसण्यापुर्वी निवेदन देवूनही कोणीच दखल न घेतल्याने संबंधीत महिलेवर उपोषणस्थळीच प्रसुती करण्याची वेळ आल्याचे बोलले जात आहे. शासन सर्वत्र बेटी बचाव, बेटी पढावचा नारा देत मोठ्या प्रमाणावर जनजागृती करत आहे. तर दुसरीकडे मात्र त्याच जनजागृतीचे बॅनर झळकलेल्या सार्वजनिक ठिकाणी उपोषणकर्त्या महिलेची प्रसुती झाल्याने कमालीचा विरोधाभास स्पष्ट होत आहे.
आंदोलनकर्त्या शेतकर्यांमुळे प्रकार उघडकीस
बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणार्थी महिलेची रात्री उशिरा प्रसुती झाली मात्र सदरील प्रकाराची कोणालाही माहिती नव्हती. आज सकाळी शेतकर्यांच्या प्रश्नावर अन्नत्याग आंदोलनासाठी एकत्रित आलेल्या शेतकर्यांनी आणि सुकाणू समितीतील आंदोलनकर्त्यांनी संबंधित कुटूंबाशी चर्चा केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. प्रा.सुशिलाताई मोराळे यांनी संबंधित महिलेशी चर्चा करुन तिच्या प्रकृतीची विचारपुस केली.
कुटूंबांनां उपोषणापासुन परावृत्त करण्याच्या जिल्हाधिकार्यांच्या पत्राकडे दुर्लक्ष
वासनवाडी येथील १६ कुटूंबांनी घरकुल प्रश्नावर १५ मार्चपासुन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरु केले होते. त्याच दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्र पाठवून उपोषणार्थ्यांच्या मुद्यांबाबत आपल्या स्तरावर तात्काळ चौकशी करुन नियमानुसार आवश्यक ती कार्यवाही करावी, केलेल्या कार्यवाहीबाबत संबंधितांस परस्पर कळवून त्यांना उक्त उपोषणापासुन परावृत्त करावे अशा सूचना दिल्या होत्या. तरीही जिल्हा परिषद प्रशासनाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पत्राकडे दुर्लक्ष केल्याने उपोषणार्थी महिलेवर उपोषणस्थळीच प्रसुत होण्याची वेळ आली.
Add new comment