लाइव न्यूज़
नगराध्यक्षांकडून अपमानास्पद वागणूक; खदीरभाई जवारीवाले यांचा स्थायी समिती सदस्यत्वाचा राजीनामा जिल्हाधिकार्यांकडे तक्रार; नगराध्यक्षांवर कारवाईची मागणी
बीड, (प्रतिनिधी):- स्थायी समितीच्या सभेत सूचना करत असतांना समितीचे सभापती तथा नगराध्यक्ष राजकीय हेतूने प्रेरित होवून अपमानास्पद वागणूक देत असल्याचा आरोप करत आघाडीच्या गटातील स्थायी समितीचे सदस्य खदीरभाई जवारीवाले यांनी स्थायी समिती सदस्यत्वाचा राजीनामा देत मंजुरीसाठी जिल्हाधिकार्यांकडे पाठवला आहे. आमच्या गटाचे संख्याबळ कमी असल्याने नगराध्यक्ष आमच्या मागण्यांकडे, प्रश्नांकडे दुर्लक्ष करत असुन त्यांच्याविरुद्ध कार्यवाही करण्याची मागणी त्यांनी पत्रात केली आहे.
बीड नगरपालिकेच्या स्थायी समितीची सभा दि.२७ फेब्रुवारी रोजी झाली होती. या बैठकीत स्थायी समितीचे सभापती तथा नगराध्यक्ष यांनी जाणिवपुर्वक राजकीय हेतूने प्रेरित होवून आपला अपमान केल्यामुळे स्थायी समिती सदस्यपदाचा राजीनामा देत असल्याचे खदीरभाई जवारीवालेे यांनी जिल्हाधिकार्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. स्थायी समितीमध्ये आमच्या गटाचे संख्याबळ कमी असल्यामुळे नगराध्यक्ष आमच्या मागण्यांकडे, प्रश्नांकडे दुर्लक्ष करतात ज्यावेळी आम्ही काही सूचना करतोत त्यावेळी अध्यक्ष तथा सभापती फोनवर बोलतात, विषयाची गंभीरता घेत नाहीत, पदाचा दुरुपयोग करतात अशी तक्रार खदीरभाई ज्वारीवाले यांनी जिल्हाधिकार्यांकडे केली असुन या प्रकरणी राजीनामा मंजुर करुन स्थायी समिती सभापती तथा नगराध्यक्षांवर कारवाई करावी अशी मागणी खदीरभाई यांनी केली आहे.
झमझम कॉलनी, खासबाग देवी रोडसह अन्य कामांना मान्यता देवूनही सुरुवात नाही
बीड शहरातील झमझम कॉलनी ते खासबाग देवी रोड याबरोबरच अजीजपुरा ते कारंजा, जुना बाजार या रस्त्यांना सन २०१६ मध्ये मान्यता देवूनही कामे सुरु करण्यात आलेली नाही. झमझम कॉलनी ते खासबाग देवी रोड हा रस्ता २०१२ मध्ये मंजुर झालेला असतांनाही त्याचे काम अद्यापपर्यंत झालेले नाही. याच कामासंदर्भात खदीरभाई जवारीवाले यांनी वेळोवेळी सूचना केल्या. परंतु त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
दोन सभापती तरीही कामे होईनात
बीड शहरातील जुना प्रभाग १० आणि आजच्या प्रभाग १६ मधुन मुखीद लाला आणि शेख मतीन हे दोघे सभापती म्हणून पालिकेत कार्यरत आहेत. सत्ताधारी गटासोबत असुनही या भागातील विकासकामे अनेक वर्षांपासुन प्रलंबित आहेत. परिणामी त्याचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत तरीही याकडे लक्ष दिले जात नसल्याने संताप व्यक्त होत आहे.
Add new comment