ग्लासला तोंड लावून पाणी पिल्याने तरुणास भोसकले
तलवाड्याजवळ सप्ताह समाप्तीच्या कार्यक्रमातील प्रकार; पाच जणांविरुद्ध गुन्हे दाखल
बीड, (प्रतिनिधी):- गावातील सप्ताह समाप्तीच्या कार्यक्रमात जेवण करुन ग्लासला तोंड लावून पाणी पिल्याने एका तरुणाच्या पोटात गजाने भोसकुन त्यास जिवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची घटना काल सुलतानपुर (ता.गेवराई) येथे उघडकीस आली. पाच जणांनी मारहाण करुन भोसकल्याने सदरील तरुण गंभीररित्या जखमी झाला असुन या प्रकरणी पाच जणांविरुद्ध तलवाडा पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
पोलिस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, तलवाड्याजवळील सुलतानपुर (ता.गेवराई) येथे दि.२८ फेब्रुवारी रोजी गावामध्ये सप्ताह समाप्तीचा कार्यक्रम होता. कार्यक्रमात जेवण केल्यानंतर विष्णु मारोती उनवणे (३०) याने ग्लासला तोंड लावून पाणी पिले. त्या कारणावरुन पाच जणांनी उनवणे यास जातीवाचक शिवीगाळ करुन लोखंडी गज, काठ्या, दांड्याने मारहाण केली. त्यानंतर घरात घुसून त्याच्या पोटात गज खुपसून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेत विष्णु उनवणे हा गंभीररित्या जखमी झाला असुन त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी विष्णुचे वडील मारोती विठोबा उनवणे यांच्या फिर्यादीवरुन सावता गिन्यानदेव खेत्रे, लक्ष्मण अच्युत खेत्रे, परमेश्वर अच्युत खेत्रे, मदन परमेश्वर खेत्रे, दिपक नामदेव बनकर (सर्व रा.सुलतानपुर) यांच्याविरुद्ध तलवाडा पोलिस ठाण्यात जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यासह ऍट्रासिटी ऍक्टप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी अर्जुन भोसले हे करीत आहेत.
Add new comment