लाइव न्यूज़
‘ईव्हीएम’ म्हणजे इच व्होट फॉर मोदी: गुजरातमधील मंत्री
Beed Citizen | Updated: March 13, 2018 - 3:15pm
अहमदाबाद, (वृत्तसंस्था):-गुजरात विधानसभेत माहिती व प्रसारण विभागाच्या १२६ कोटी रुपयांच्या पुरवणी मागणीवर प्रदीपसिंह जडेजा बोलत होते.
गुजरातमधील मतदारांनी भाजपाला सत्तेत आणले असून ‘ईव्हीएम’ म्हणजे ‘इच व्होट फॉर मोदी’ असे मतदारांना वाटत असल्याचे गुजरातमधील गृहराज्यमंत्री प्रदीपसिंह जडेजा यांनी म्हटले आहे. मतदारांसाठी राबवलेल्या जनजागृती मोहीमेसाठी त्यांनी निवडणूक आयोग आणि माहिती व प्रसारण विभागाचे कौतुक केले आहे.
गुजरात विधानसभेत माहिती व प्रसारण विभागाच्या १२६ कोटी रुपयांच्या पुरवणी मागणीवर प्रदीपसिंह जडेजा बोलत होते. विरोधकांवर निशाणा साधत ते म्हणाले, ज्यावेळी देशात गुजरातला बदनाम करण्याचा प्रयत्न होत होता, त्यावेळी माहिती व प्रसारण विभागाने सरकारने राबवलेल्या विकासकामांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम केले. जर देशात गुजरात अव्वल स्थानी असेल तर यात माहिती व प्रसारण विभागाचे योगदान मोलाचे असेल, असे त्यांनी नमूद केले. हे कलयूग असून कलयूगात फक्त चांगले काम करणे पुरेसे नसते. चांगले काम जनतेपर्यंत पोहोचवणेही तितकेच महत्त्वाचे असते, असे त्यांनी सांगितले.
‘मतदारांमध्ये जनजागृती करण्यात जनसंपर्क विभागाला यश आले. त्यामुळे मतदानाचा टक्का वाढला आणि याचे परिणाम निकालातही दिसून आले, असे त्यांनी नमूद केले. निकालानंतर ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटवर शंका उपस्थित करणार्यांना चपराक बसली. ईव्हीएम म्हणजे इच व्होट फॉर मोदी असे मतदारांना वाटले आणि त्यांनी भाजपाला भरभरुन मतदान केले, असे जडेजा यांनी म्हटले आहे. या विभागांना मिळणारा निधी अत्यंत कमी आहे. पण त्यांचे काम अत्यंत महत्त्वाचे असते, असे त्यांनी म्हटले आहे. तर कॉंग्रेसला निवडणुकीच्या कालावधीतच मंदिराची आठवण आली, असे सांगत त्यांनी राहुल गांधींवर टीकास्त्र सोडले.
Add new comment