लाइव न्यूज़
बीड पंचायत समितीतील राडा आघाडीच्या दोन सदस्यांना भोवला
Beed Citizen | Updated: March 13, 2018 - 3:03pm
पंचायत समिती सभापती मनिषा कोकाटे यांच्या फिर्यादीवरुन सोनवणे, जाधव यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल
बीड, (प्रतिनिधी):- येथील पंचायत समिती अंतर्गत नरेगा कार्यालयात काकु-नाना विकास आघाडीच्या दोन पंचायत समिती सदस्यांनी कर्मचार्यांना शिवीगाळ करुन धक्काबुक्की करत मारहाण केल्याची घटना दि.८ मार्च रोजी घडली होती. या प्रकरणात प्रशासनाच्यावतीने फिर्याद देण्यासाठी कोणीच पुढे न आल्याने रात्री उशिरा पंचायत समितीच्या सभापती मनिषा ज्ञानेश्वर कोकाटे यांच्या तक्रारीवरुन आघाडीचे सदस्य उत्रेश्वर सोनवणे व आनिल जाधव या दोघांविरुद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
बीड येथील पंचायत समिती कार्यालयाच्या आवारात दि.८ मार्च रोजी चांगलाच राडा झाला होता. दोन पंचायत समिती सदस्यांनी कर्मचार्यांना नरेगा कार्यालयातून बाहेर काढत मारहाण केल्याची चर्चा होती. या प्रकरणी गटविकास अधिकार्यांनी कृषि विस्तार अधिकारी सुर्यवंशी व सहाय्यक कार्यक्रमाधिकारी गुंजाळ या दोघांना पोलिसात तक्रार देण्यासंदर्भात सूचना केल्या होत्या. मात्र प्रशासनाच्यावतीने तक्रार देण्यासाठी कोणीच पुढे आले नाही अखेर रात्री उशिरा पंचायत समितीच्या सभापती मनिषा ज्ञानेश्वर कोकाटे यांनी स्वत: शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांनी म्हटले आहे की, पंचायत समिती सदस्य उत्रेश्वर सोनवणे (नाळवंडी गण) आणि अनिल जाधव (नेकनूर गण) या दोघांनी संगनमत करुन बीड पंचायत समितीमध्ये शिवीगाळ करुन धक्काबुक्की मारहाण करुन शासकीय कामात अडचण निर्माण केली. त्यावरुन दोघांविरुद्ध कलम ३५३, ३२३, ५०४, ३४ भादंवीप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास सपोनि. जाधव हे करीत आहे.
Add new comment