वणवा देशभर पसरेल: शरद पवारांचा इशारा

मुंबई, (प्रतिनिधी):-भाजपा सरकारने घोषणा खूप केल्या, पण प्रत्यक्षात अंमलबजावणी झाली नाही. यामुळेच उपेक्षित वर्ग आज मुंबईत चालत आला. आता राज्य सरकारने त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात. अन्यथा हा संघर्ष पुढे राज्य व देशात वणव्यासारखा पसरत जाईल, असा इशाराच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे.

मुंबईतील शेतकऱ्यांच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, आज जी अस्वस्थता शेतकऱ्यांमध्ये दिसते, ती आता रस्त्यावर दिसू लागलीये. देशाच्या कानाकोपऱ्यात हीच अस्वस्थता असून आजच्या राज्यकर्त्यांना शेती, शेतकरी आणि शेती अर्थव्यवस्थेची आस्था नाही. कर्जमाफीचा मुद्दा देशभरात ऐरणीवर आला आहे, असे त्यांनी सांगितले.

वनजमीन कसणारा वर्ग प्रामुख्याने आदिवासी असतो. पूर्वीच्या सरकारने त्यांना जमिनी दिल्या. मात्र यातून जे शेतकरी बाकी राहिले त्यांच्यासाठी गेल्या तीन वर्षांपासून सरकारकडे पाठपुरावा सुरु आहे. यासंबंधीचा निर्णय घ्यायला सरकारला हरकत नाही, असे त्यांनी नमूद केले.

८२ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल असे सरकारने सांगितले होते. पण आता हा आकडा कमी होत आहे. कर्जमाफीच्या घोषणा खूप झाल्या. पण अंमलबजावणी होत नाही. केंद्र सरकारने तोट्यात असलेल्या बँकांना ८० हजार कोटी रुपये दिले. हा तोटा शेतकऱ्यांमुळे झाला नाही. नीरव मोदी सारखी लोकं त्यासाठी कारणीभूत आहेत, असा आरोप त्यांनी केला. पण शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसारखी सरकारकडे पैसे नाही. मनमोहन सिंग सरकारने शेतकऱ्यांसाठी ७१ हजार कोटी दिले होते. पण सध्याच्या सरकारमध्ये तशी नियत नाही, अशी टीका त्यांनी केली.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.