लाइव न्यूज़
रक्ताळलेल्या पायांनी लाखो शेतकर्यांचा आक्रोश
Beed Citizen | Updated: March 12, 2018 - 3:03pm
मुंबई, (प्रतिनिधी):- जगाचा पोशिंदा असलेल्या बळीराजाने आज मुंबईतील सत्ताधार्यांना घाम फोडला. शेकडो मैल अनवानी पायाने मुंबईत दाखल झालेल्या शेतकर्यांच्या आक्रोशाने मुंबईच्या नव्हे तर राज्याच्या कानठळ्या बसल्या. रक्ताळलेल्या पायांनी लाखो शेतकर्यांनी आझाद मैदानावर एका नव्या क्रांतीचा बिगुल वाजवला. मुंबईच्या दिशेने मोर्चा कुच करत असतांनाही देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या मंत्र्यांनी केवळ बघ्याची भुमिका घेतली. आता मात्र चालबाजी कराल तर अन्नत्याग करू अशा शब्दात लाखो शेतकर्यांनी भाजप सरकारला खडसावले.
अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली नाशिकहून निघालेला हजारो शेतकरी, शेतमजूर, कष्टकर्यांचा लॉंग मार्च आज (सोमवार) पहाटेच्या सुमारास मुंबईतील आझाद मैदानात दाखल झाला. सर्व शेतकर्यांना विनाअट संपूर्ण कर्जमाफी द्या, कसत असलेल्या जमिनी शेतकर्यांच्या नावावर करा, या आणि अन्य मागण्यांसाठी शेतकरी आज विधानसभेला घेराव घालणार आहेत. या मोर्चाला अभूतपूर्व पाठिंबा मिळत असून आता कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना, मनसेसह सर्व राजकीय पक्षही शेतकर्यांच्या मागे उभे राहिले. त्यामुळे कमालीच्या अस्वस्थ झालेल्या सत्ताधारी देवेंद्र फडणवीस सरकारची रविवारी धावपळ झाली. शेतकर्यांच्या आंदोलनातील आक्रमकता कमी करण्यासाठी राज्यातील भाजप सरकारने तडजोडीची भूमिका घेत जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना किसान सभेच्या नेत्यांच्या भेटीला पाठवले. या भेटीत महाजन यांनी सोमवारी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यासाठी निमंत्रण दिले. मात्र, मागण्यांबाबत लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय हटणार नसल्याची ठाम भूमिका आंदोलनकर्त्यांनी कायम ठेवली. सरकारने आधीच चर्चा केली असती तर ही वेळ आली नसती. आता मात्र मागण्यांची पूर्तता झाल्याशिवाय माघार नाही, असा इशारा किसान सभेचे सरचिटणीस आणि शेतकरी आंदोलनाचे समन्वयक अजित नवले यांनी दिला. हा मोर्चातील शेतकर्यांचा जत्था रविवारी सोमय्या मैदानावर दाखल झाला. तिथेच हा मोर्चा अडवण्याचा सरकारचा इरादा आहे. फडणवीस सरकार आज, या प्रश्नावर कोणता तोडगा काढणार याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सहा जणांची समिती नियुक्त. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, एकनाथ शिंदे, पांडुरंग फुंडकर, विष्णू सावरा, सुभाष देशमुख यांचा या समितीत समावेश आहे.
कसत असलेल्या वनजमिनी शेतकर्यांच्या नावे करा
विनाअट संपुर्ण कर्जमुक्ती द्या
शेतीमालाला दिडपट हमीभाव द्या
स्वामीनाथन आयोगाच्या रास्त भावाच्या शिफारशींची अंमलबजावणी करा
वनाधिकार कायद्याची संपुर्ण अंमलबजावणी करा
बोंडअळी, गारपीटग्रस्तांना एकरी ४० हजारांची भरपाई द्या
वीजबिल माफ करा, दुधाला किमान ४० रु.लिटर भाव द्या
दहावी व बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून आंदोलक शेतकर्यांनी रात्रीच आझाद मैदानाकडे प्रस्थान ठेवले.
रात्रीच सोमय्या मैदानाकडून आझाद मैदानाकडे कूच करणार्या शेतकर्यांसाठी शीख समाजाने विशेष लंगरचे आयोजन केले होते तर अनेक ठिकाणी मुस्लीम बांधव शेतकर्यांसाठी पाण्याच्या बाटल्या आणि बिस्कीटचे पुडे घेऊन शेतकर्यांची वाट पाहत होते.
Add new comment