लाइव न्यूज़
जिल्हाकचेरीसमोर मुकबधिर तर जिल्हा परिषदेसमोर कामगारांचे आंदोलन
बीड, (प्रतिनिधी):- बीड जिल्हा मुकबधिर असोसिएशनच्यावतीने आज जिल्हाकचेरीसमोर शंभर टक्के मुकबधिर व्यक्तींची शासन अधिनियम १९९५ (१९९६ चा १) नुसार त्वरीत शासकीय नोकरीत नियुक्त करावी या मागणीसाठी बेमुदत अमरण उपोषण सुरु करण्यात आले आहे तर जिल्हा परिषदेसमोर कामगारांनी मराठवाडा जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम व पाटबंधारे कामगार-कर्मचारी संघटनेच्यावतीने मारुफ करातील कामगारांच्या मागण्यासंदर्भात उपोेषण सुरु करण्यात आले आहे. यासोबतच गेवराई तालुका अपंग हक्क कृती समितीने अपंगांना ३ टक्के निधी खर्च करावा आणि विविध मागण्यासाठी हे आंदोलन सुरु केले आहे तर अंगणवाडी ताईंच्या विविध प्रश्नासाठी सचिन आंधळे यांनी सुरु केले आहे.
जिल्हाकचेरीसमोर मुकबधिरांनी बेमुदत अमरण उपोषण सुरु केले असुन शंभर टक्के मुक-कर्णबधिर व्यक्तींची शासन अधिनियम १९९५ (१९९६ चा १) नुसार त्वरीत शासकीय नोकरीत नियुक्ती करावी, मुकबधिर बेरोजगार यांना राज्य व केंद्र शासनाकडून भत्ता सुरु करावा यासह विविध मागण्या निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या आहेत. जिल्हापरिषदेसमोर मराठवाडा जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम व पाटबंधारे कामगार-कर्मचारी संघटनेने कामगारांच्या प्रश्नासंदर्भात उपोषण सुरु केले आहे. मारुफ करातील कामगारांना १२ वर्षाच्या व २४ वर्षाच्या सेवेनंतर आश्वासित प्रगती योजनेचा लाभ द्यावा त्याचप्रमाणे मागील निघणारा फरक देण्यात यावा यासह विविध मागण्या कामगारांनी निवेदनाद्वारे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना कळवल्या आहेत. गेवराई येथील तालुका अपंग कृती समितीने अपंगांना ३ टक्के निधी खर्च करावा, प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर तालुक्यातील अपंगांची नोंदणी तात्काळ करुन तशी यादी पंचायत समितीमार्फत प्रसिद्ध करावी यासह विविध मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका व मदतनीस महासंघाच्यावतीने अंगणवाडी कर्मचार्यांचे सेवानिवृत्तीचे वय ६५ वषर् कायम ठेवावे, सेवानिवृत्त झालेल्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना सेवा समाप्ती लाभ द्यावा, इंधन व प्रवास भत्ता देण्यात यावा, ऑफलाईन मानधन देण्यात यावे यासह विविध मागण्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदनाद्वारे कळविल्या आहेत.
Add new comment