किसान मोर्चाशी सरकारची चर्चेची तयारी, लेखी आश्नासनाशिवाय माघार नाही- आंदोलक
मुंबई- विविध मागण्यांसाठी किसान सभेच्या वतीने शेतकरी व आदिवासींचा नाशिक येथून काढलेला लाँग मार्च आज मुंबईत दाखल झाला. शनिवारी रात्री ठाण्यात मुक्काम केल्यानंतर 35 हजार शेतक-यांसह किसान मोर्चाने मुंबईत प्रवेश केला आहे. किसान मोर्चा आज मुंबईत मुक्काम ठोकेल तर सोमवारी सकाळी विधान भवनाला घेराव घालणार आहे. जोपर्यंत आपल्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत घेराव कायम ठेवण्याची भूमिका मोर्चेक-यांनी आखली आहे. किसान सभेचे डाॅ. अजित नवले व अामदार जे. पी. गावित, डॉ. अशोक ढवळे, किसन गुजर, अर्जुन आडे, सुनील मालुसरे महामोर्चाचे नेतृत्व करत आहेत.
किसान मोर्चाच्या प्रमुख मागण्या-
- कसत असलेल्या वनजमिनी शेतकऱ्यांच्या नावे कराव्या.
- कष्टकरी शेतकऱ्यांना विनाअट सरसकट कर्जमाफी.
- शेतीमालाला हमीभाव, स्वामिनाथन आयोग, वनाधिकार कायद्याची अंमलबजावणी करावी.
- पुनर्वसनाचे प्रश्न निर्माण न करता पश्चिमवाहिनी नद्यांचे समुद्रात जाणारे पाणी पूर्वेकडे वळवून शेतकऱ्यांच्या शेतीसाठी पाणी द्यावे.
- बोंडअळी व गारपीटग्रस्तांना एकरी 40 हजार रुपये भरपाई.
- शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करावे, दुधाला किमान 40 रुपये प्रतिलिटर भाव मिळावा म्हणून तातडीने हस्तक्षेप करावा आदी मागण्या आंदोलकांनी केल्या आहेत.
मनसे, शिवसेनेसह काँग्रेस- राष्ट्रवादीचा पाठिंबा-
किसान मोर्चाला मनसे, शिवसेना, काँगेससह व राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिला आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीही मोर्चाला पाठिंबा दिला असून आज ते मुंबईत मोर्चाचे स्वागत करणार आहेत. ज्या कम्युनिस्टांना विरोध करून शिवसेनेने राजकारण केले त्यांच्याच शेतकरी मोर्चाला पाठिंबा देऊन शिवसेनेने सगळ्यांना चकित केले. सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी मोर्चेकऱ्यांची भेट घेऊन त्यांना सुविधा पुरवल्या. शिवसेना सत्तेत नसतानाही आणि आता सत्तेत असली तरी शेतक-यांच्या कायम पाठीशी राहते व पुढेही राहील असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. सरकार किसान मोर्चाबाबत सकारात्मक निर्णय करेल असा मला विश्वास आहे. मी मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात आहे असेही शिंदे यांनी सांगितले. दरम्यान, मोर्चा जसा जसा मुंबईत दाखल झाला तसा सरकारने शेतक-यांशी चर्चा करण्याची तयारी दाखवली आहे. सरकारच्या वतीने नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन हे शेतक-यांशी विक्रोळी येथे आज दुपारी संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्री शिष्टमंडळाशी बोलतील. तसेच त्यांच्या मागण्यावर सकारात्मक निर्णय घेतील. मी मोर्चाला चर्चेचे आवाहन करतो. मात्र, लेखी आश्वासन दिल्याशिवाय माघार घेतली जाणार नाही अशी आंदोलकांनी भूमिका घेतली आहे.
Add new comment