लाइव न्यूज़
देशसेवेच्या रक्षणासाठी बीडच्या सैनिकांचे मोठे योगदान- डॉ.भारतभूषण क्षीरसागर
बीड, (प्रतिनिधी):- स्वातंत्र्यपुर्व काळापासून बीड जिल्ह्यातील अनेक सैनिकांनी आपले जीवन अर्पीत केले आहे. स्वातंत्र्यसैनिकांप्रमाणेच सैन्यात भरती होवून देशसेवेच्या रक्षणासाठी बीडच्या सैनिकांचे मोठे योगदान असल्याचे प्रतिपादन नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी केले आहे.
बीड येथील मर्ल्टी पर्पज ग्रांऊडच्या मैदानावर रविवार दि.११ रोजी भव्य सैनिक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यासाठी वीर माता, वीर पत्नी, माजी सैनिक, अपंग सैनिक, पुरस्कार प्राप्त माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर, स्टेशन कमांडर विक्रांत नायर, उपजिल्हाधिकारी बी.एम. काबंळे, निवासी जिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, कर्नल त्रिपाठी, विक्रम हेवले, बांधकांम सभापती सादेक अली, सय्यद शाकेर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलतांना डॉ.क्षीरसागर म्हणाले की भारत मातेचे रक्षण करतांना बीड जिल्ह्यातील २२ सैनिकांनी आपल्या प्राणाची आहूती दिली आहे. देशसेवेसाठी हे सैनिक सीमेवर असतात म्हणूनच आपण आज सुरक्षीतपणे जीवन जगत आहोत. देशसेवेच्या रक्षणासाठी बीडच्या सैनिकाचे मोठे योगदान आहे. आजही सैन्यामध्ये ५५०० हजार सैनिक सैन्यात कार्यरत असून ४००० हजार माजी सैनिक आहेत. सैन्याचा मानाचा पुरस्कार वीरचक्र विजेते अरूण रामलिंग माळी हे बीडचेच असून त्यांच्याबरोबर नऊ सैनिकांना संरक्षण विभागाच्या मार्फत उत्कृष्ट कार्याबद्दल पुरस्कुत करण्यात आले आहे. माजी सैनिकांच्या अनेक समस्या असून या सैनिकांसाठी सैनिक संकुलाकरीता जागेची गरज आहे तसेच माजी सैनिकांसाठी स्वंतत्र्य रूग्णालय सुरू करण्याकरीता जागेची मागणी करण्यात आली आहे तसे प्रस्ताव शासन दरबारी दाखल करण्यात आले आहेत. आ.जयदत्त क्षीरसागर यांच्या माध्यमातून ही कामे पुर्ण केली जातील नगर परिषदेमार्फत बालाघाट शिक्षक कॉलनीत शहीद स्मारकाचे काम सुरू असून ते लवकरच पुर्ण करण्यात येईल. शहरात राहात असलेल्या माजी सैनिकांच्या निवासस्थानाची घरपट्टी व नळपट्टी नगर परिषदेने माफ केली असून ज्या मागण्या शासनस्थरावर प्रलंबीत आहेत त्या सोडविण्यासाठी नक्कीच पुढाकार घेवू असे ते म्हणाले. यावेळी सैनिकी विद्यालयाचे मिलिंद शिवणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली बीडच्या सैनिकी विद्यालयाच्या विद्यार्थ्यानी देशसेवेवर आधारीत गीतावर नृत्य सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. तर नगराध्यक्ष डॉ.क्षीरसागर यांच्या हस्ते श्रीमती लखपतीबाई काकडे यांना वीरमाता पुरस्कार देवून गौरवित करण्यात आले. यावेळी जिल्हाभरातून मोठ्या संख्येने माजी सैनिक व त्यांचे कुटूंबीय मेळाव्यासाठी उपस्थित होते तर बाजीराव केदार व त्यांच्या सहकार्यानी मेळावा यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले.
Add new comment