लाइव न्यूज़
ऊसतोड मजुर महिलेस सात दिवस डांबून ठेवत मारहाण
Beed Citizen | Updated: March 10, 2018 - 3:01pm
महिला गंभीर जखमी; मुकादमासह पाचविरुद्ध पोलिसात तक्रार
बीड, (प्रतिनिधी):- मुकादमाकडून कारखाना परिसरात होत असलेल्या त्रासाला कंटाळून गावी आल्यानंतर ऊसतोड मजुर महिलेचे अपहरण करुन तिला सात दिवस डांबुन ठेवण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. सात दिवसात मुकादमासह अन्य तिघांनी महिलेला बेदम मारहार करत जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या आहेत. सदरील महिला गंभीररित्या जखमी झाली असुन तिच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी केज पोलिस ठाण्यात मुकादमासह चौघांविरुद्ध तक्रार देण्यात आली आहे.
केज तालुक्यातील नागझरी येथील कौसाबाई बाबासाहेब मुंडे या ऑक्टोबर २०१७ मध्ये कुटूंबासह तिरा सहकारी साखर कारखाना, सोलापुर येथे ऊसतोडीसाठी गेल्या होत्या. त्याठिकाणी मुकादमासह अन्य काही जण दारु पिवून सतत त्रास देत होते. या प्रकरणी पांगरी (जि.सोलापुर) पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. सदरील प्रकरणानंतर कौसाबाई मुंडे कुटूंबासह नागझरी (ता.केज) येथे परतल्या. त्याचा राग मनात धरुन काही लोकांनी नागझरी शिवारातून कौसाबाई मुंडे यांचे अपहरण केले. सात दिवस अज्ञात ठिकाणी डांबुन ठेवत बेदम मारहाण करण्यात आली. अपहरणकर्त्याच्या तावडीतून सुटका करत कौसाबाई मुंडे यांनी घर गाठले. अज्ञात चार ते पाच जणांनी केलेल्या मारहाणीमध्ये कौसाबाई गंभीररित्या जखमी झाल्या असुन त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी कौसाबाई मुंडे यांनी मुकादम दत्ता बाबासाहेब तोंडे, बाळू अंकुश तोंडे यांच्यासह अन्य तिघांविरुद्ध केज पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. दुपारी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.
Add new comment