लाइव न्यूज़
तलाकसंदर्भात कायदा करताना महिलांच्या मनाचा विचार करावा – प्रा. फौजिया खान
Beed Citizen | Updated: March 9, 2018 - 3:34pm
औरंगाबाद (प्रतिनिधि)
मुस्लिम महिलांच्या तलाकसंदर्भात कायदा करताना त्यांच्या मनाचा विचार केला पाहिजे, असे स्पष्ट मत राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा प्रा. फौजिया खान यांनी व्यक्त केले. राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आज गुरुवारी हडको येथील राष्ट्रवादी भवनात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीसाठी प्रा. फौजिया खान शहरात आल्या असता पत्रकार परिषदेत बोलत होत्या.
महिलांवरील अत्याचार, गुन्हेगारीच्या घटनांत महाराष्ट्रासह देशात वाढ झाली आहे, अशी टिप्पणी करून प्रा. फौजिया खान म्हणाल्या, पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी पहिले पाऊल उचलले. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महिलासांठी जागा आरक्षित ठेवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. त्यामुळेच विविध पदांवर महिला कार्यरत असल्याचे चित्र पाहायला मिळते. वेंद्रात भाजपाला बहुमत आहे. त्यांनी लोकसभा विधानसभेत महिलांसाठी ५० टक्के जागा आरक्षित करण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली. बेटी बचाव, बेटी पढाव, अशा नुसत्या घोषणा दिल्या जात आहेत. त्यासाठी आर्थिक तरतूद केलेली नाही, उलट यापूर्वीच्या सरकारने केलेल्या तरतुदीत घट केली आहे, असा आरोप करून स्त्रीभ्रूण हत्या रोखणे आणि संविधान बचावबाबत जनजागृतीची मोहीम पक्षाच्या वतीने हाती घेतली जाणार आहे, त्यासंबंधीचा ठराव आजच्या बैठकीत संमत करण्यात आला, असेही त्या म्हणाल्या.
Add new comment