औरंगाबाद मध्ये कचरा प्रश्न पेटला, पोलिसांकडून हवेत गोळीबार
पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख जखमी ;पोलीसाकडुन लाठीमार
————————————————————————————
औरंगाबाद प्रतिनिधी ।
औरंगाबाद कचरा टाकण्यावरून आंदोलन पेटले असून आंदोलक आक्रमक झाले आहेत. औरंगाबाद-मुंबई महामार्गावरील मिटमिटा या ठिकाणी नागरिकांनी आंदोलन छेडले. यावेळी आंदोलकांचा उद्रेक पाहून त्यांना रोखण्यासाठी
पोलिसांनी लाठीमार आणि अश्रूधूराच्या कांड्या फोडल्या. तसेच संतप्त जमावाला रोखण्यासाठी गोळीबार करण्यात आल्याचे वृत्त आहे.
दरम्यान, या घटनेमुळे महामार्गावर वाहनांच्या प्रचंड रांगा लागल्या आहेत. यामध्ये शाळेंच्या बसेस अडकल्या आहेत. शेकडो विद्यार्थी अडकून पडले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबाद गेल्या काही दिवसांपासून तापत असलेल्या कचरा प्रश्नाने बुधवारी पेट घेतला. संतप्त नागरिकांना कचरा गाड्यांवर दगडफेक करत तोडफोड केली. संतप्त जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केली तसेच अश्रूधूराच्या नळकांड्या फोडल्या. यावेळी जमावाकडून पोलिसांवरही दगडफेक करण्यात आली. संतप्त जमावाने पोलिसांच्या दोन गाड्यांवरही दगडफेक करत गाड्यांची तोडफोड केली. यात तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.
हिंसक होत चाललेल्या आंदोलनावर नियंत्रण मिळण्यासाठी सुमारे ८०० पोलिसांचा फौजफाटा सध्या याठिकाणी तैनात करण्यात आला आहे. हिंसक आंदोलनामुळे औरंगाबाद-मुंबई महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.
Add new comment