लाइव न्यूज़
दरोड्याच्या तयारीतील बारा जण पकडले अहमदनगरमधील शेवगाव शिवारात कारवाई; बाराही जण बीड जिल्ह्यातील रहिवाशी
Beed Citizen | Updated: March 7, 2018 - 3:00pm
बीड, (प्रतिनिधी):- दरोडा टाकण्याच्या उद्देशाने रस्त्याच्याकडेला दबा धरुन बसलेल्या बारा जणांना गजाआड करण्यात शेवगाव (जि.अहमदनगर) पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी तीन ठिकाणी केलेल्या कारवाईत १८ जण पकडले असुन त्यातील १२ जण बीड जिल्ह्यातील रहिवाशी आहेत. त्यांच्याकडून लाल मिरची पुड, लोखंडी गज, तलवार, सुती दोरी, लोखंडी पाईप असे हत्यार जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी शेवगाव, पाथर्डी, शनिशिंगणापुर पोलिस ठाण्यात तीन गुन्हे दाखल झाले आहेत.
अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव पोलिसांनी काल रात्री दरोड्याच्या तयारीतील टोळी गजाआड केली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार विठ्ठल लक्ष्मण लष्करे, सत्यवान भगवान लष्करे, सुनिल पांडुरंग विटकर, अमोल भिमराव गायकवाड (रा.नवगण राजुरी ता.बीड), परशुराम विष्णु परिहार ( २९, कोळगाव हवेली ता.बीड), योगेश नवनाथ गायकवाड (चर्हाटा, ता.बीड) हे सहा जण शेवगाव-आखेगाव रोडच्या लगत झुडपात दबा धरुन बसले होते. त्यांच्याकडे लोखंडी गज, लाल मिरची पुड, तलवार, दोरी, लोखंडी पाईप असे हत्यार आढळून आले. दरोड्याच्या तयारीत असलेल्या या सहा जणांना पोलिसांनी अटक केली असुन पोलिस नाईक विशाल रामचंद्र गवांदे यांच्या फिर्यादीवरुन सहा जणांविरुद्ध शेवगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरी कारवाई पाथर्डी हद्दीतील मढी ते धामणगाव रस्त्यावर करण्यात आली. याठिकाणी परशुराम मोहन गायकवाड (एकनाथवाडी ता.पाथर्डी), हिरालाल सुखदेव जाधव (मिडसांगवी ता.पाथर्डी), वसिम अंन्सार शेख (शिंगोटेवस्ती ता.पाथर्डी), रोहित उमेश जाधव (रा. गांधीनगर, बीड), मिनाबाई अशोक शिंदे, शिला अशोक शिंदे (रा.गेवराई जि.बीड) या सात जणांना दरोडा घालण्याच्या तयारीत अटक केली असुन त्यांच्याकडून हत्यारे जप्त करण्यात आली. याप्रकरणी पो.ना.सुनिल चव्हाण यांच्या फिर्यादीवरुन पाथर्डी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिसरी कारवाई शनिशिंगणापुर हद्दीतील घोडेगाव-शेवगाव रस्त्यावर करण्यात आली. गणेश उर्फ गणपत रामचंद्र शिंदे (रा.कोकणगाव ता.कर्जत), बबन किसन विटकर (बार्शीनाका, जि.बीड), निलेश पांडुरंग गायकवाड (माटेगाव ता.गेवराई), अर्जुन तुळशीराम जाधव, सुगंधा भिका भोसले (अहमदनगर) या पाच जणांकडून दरोडा टाकण्याच्या तयारीतील शस्त्र जप्त करुन त्यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पोकॉ.विशाल दळवी यांच्या फिर्यादीवरुन शनिशिंगणापुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिन्ही कारवाई १८ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असुन त्यातील १२ जण बीड जिल्ह्यातील रहिवाशी असल्याने खळबळ उडाली आहे.
Add new comment