मोबदल्यासाठी आत्महत्येचा इशारा देणाऱ्या शेतकऱ्याचा मृत्यू
वडवणी -प्रतिनिधी
----------------------------------
रेल्वे मार्गासाठी शासनाने संपादीत केलेल्या जमिनीचा योग्य मावेजा मिळावा यासाठी विष प्राषण करत आत्महत्या करण्याचा इशारा देणाऱ्या मनोहर लक्ष्मण पतंगे या शेतकऱ्याचा धुळवडीच्या दिवशी हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. मातीमोल भावात सोन्यासारखी जमिनीवर खोदकाम करून ताबा घेतल्याने मानसिक धक्का बसल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. मनोहर पतंगे यांच्या मृत्यूमुळे वडवणी शहर आणि परिसरातील बाहेगव्हाण मोरवड, हिवरगव्हाण आदी भागातील शेतकरी संतप्त झाले आहेत.
नगर-बीड-परळी या अनेक वर्षापासून रखडलेल्या रेल्वे मार्गाचे काम रेल्वे प्रशासनाने चालू केले आहे. या कामासाठी आवश्यक असणारी यंत्रणा तालुक्यातील बाहेगव्हाण शिवारात दाखल झाली आहे. बाहेगव्हाण शिवारात रेल्वे प्रशाससनाने एक कॅम्प उभारले आहे. प्रत्यक्ष माती खोदकाम सुरू झाले आहे. मात्र या मार्गात जमिन गेलेल्या शेतकऱ्याना अद्यापही योग्य मावेजा देण्यात आला नाही. केवळ ११०० रूपये व १३०० रूपये गुंठा या प्रमाणे मावेजा देण्यात आला. त्यामुळे बाहेगव्हाण व वडवणी येथील संतप्त शेतकऱ्यांनी थेट बीडचे जिल्हाधिकारी कार्यालय गाठून योग्य मावेजा मिळाला नाही तर विष प्राषण करत आत्महत्या करण्याचा इशारा दिला होता.
प्रशासनाने शेतकऱ्याच्या या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करून वडवणी व बाहेगव्हाण शिवारातील रेल्वे मार्गाचे खोदकाम सुरू केले. ज्या जमिनीला एकरी पन्नास ते साठ लाख मिळायला पाहिजेत त्या जमिनीचा ताबा सरकार चाळीस ते बेचाळीस हजारात घेत असून शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्याचा इशारा देऊनही त्यांचा साधा विचारही करीत नाही. कोणतीही चर्चा न करता जमिनीवर रेल्वेसाठी खोदकामही सुरू केले. हे पाहिल्यावर वडवणी येथील पतंगे यांचे मानसिक संतुलन ढासळले. उदरनिर्वाहाचे मुख्य साधनच सरकार हुकुमशाही पद्धतीने हिसकावून घेत आहे. आता परिवारातील सदस्यांनी कसे जगायचे या चिंतेने ते व्याकूळ झाले. या धक्क्यानेच २ मार्चला त्यांचा मृत्यू झाला. रेल्वे प्रशासनाला कोणतीही दया आली नाही. वेळीच दखल घेवून उपाययोजना केली असती तर पतंगे यांचा जीव गेला नसता असे वडवणीतील नागरिकांचे म्हणणे आहे.
Add new comment