गारपीट होण्याचा इशारा प्रादेशिक हवामान खात्याने मागे घेतला
येत्या बुधवारी मध्य महाराष्ट्रात तर गुरुवारी विदर्भातही गारपीट होण्याची शक्यता केंद्रीय हवामानशास्त्र विभागाकडून वर्तवण्यात आली होती. मात्र आता हा इशारा मागे घेण्यात आला आहे. राज्यात गारपीट होणार नाही असं आता हवामान खात्याकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
विदर्भात तापमानामध्ये 2 ते 3 अंशांनी वाढ झाली आहे. त्यामुळे गारपीट होण्याचा इशारा प्रादेशिक हवामान खात्याने मागे घेतला आहे. राज्याच्या इतर भागांत हवा कोरडी राहील. काही आठवड्यांपूर्वी विदर्भ आणि मराठवाड्यात गारपिटीमुळे उभ्या पिकांचे अतोनात नुकसान झालेच, शिवाय काही शेतकऱ्यांचा बळीही गेला होता. त्यामुळे या गारपिटीच्या इशाऱ्याने शेतकऱ्यांच्या मानेवर टांगती तलावर होती असं म्हणायला हरकत नाही.
अधूनमधून गारपिटीचे इशारे मिळत असल्यामुळे राज्यातील विशाल भूभागातील शेतकरी भयग्रस्त झाले होते. पण हवामान खात्याच्या नव्या अंदाजामुळे शेतकऱ्यांनी सुटकेचा श्वास घेतला आहे.
Add new comment