लाइव न्यूज़
ऐतिहासिक दुवासाठी लाखो हात पुढे! प्रचंड शिस्तीत तीन दिवसीय इज्तेमाला सुरूवात; उत्कृष्ट नियोजनात हजारो स्वयंसेवक झटू लागले!
Beed Citizen | Updated: February 24, 2018 - 3:09pm
औरंगाबाद/बीड (प्रतिनिधी) महाराष्ट्राच्या तीन दिवसीय इज्तेमाला आजपासून सुरूवात झाली आहे. देशभरातुन आलेल्या लाखो समाजबांधवांच्या उपस्थितीत सुरू झालेल्या इज्तेमासाठी राज्याच्या कानाकोपर्यातून अनेकजण दाखल होत आहेत. इज्तेमास्थळी लाखोंचा जनसैलाब पहायला मिळत असुन प्रचंड शिस्त, उत्कृष्ट नियोजन, हजारो स्वयंसेवकांचे सहकार्य आणि नमाजनंतर दुवासाठी उठणारे लाखो हात हे अवर्णनिय असुन औरंगाबादच्या इज्तेमाची नोंद भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी होत आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील लिंबेजळगाव येथील तीन दिवसीय इज्तेमाला आज (दि.२४) पासुन सुरूवात झाली आहे. राज्याच्या कानाकोपर्यातून मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने इज्तेमास्थळी दाखल होत आहेत. लाखो भाविक काल पासून इज्तेमास्थळी अल्लाहची उपासना करत असुन आणखी तेवढेच भाविक रस्त्यामध्ये औरंगाबादच्या दिशेने कुच करतांना दिसत आहेत. प्रत्येक ठिकाणी भाविकांच्या सोयीसाठी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. शुक्रवारी दुपारची नमाज मौलाना साद सहाब यांच्या उपस्थितीत झाल्यानंतर सायंकाळपासूनच इज्तेमास्थळी लोकांचा ओघ सुरू झाला. प्रत्येकठिकाणाहुन समाजबांधवांचे जथ्थेच्या जथ्थे लिंबेजळगावच्या दिशेने जातांना दिसून येत आहेत. इज्तेमास्थळी अभुतपूर्व व्यवस्था करण्यात आली आहे. हजारोंच्या संख्येने वाहने दाखल होत असले तरी कसल्याही प्रकारची समस्या त्याठिकाणी उदभवली नसुन हजारो स्वयंसेवक एकमेकांच्या मदतीला धावून येत आहेत. इज्तेमाच्या माध्यमातून प्रचंड शिस्त, उत्कृष्ट नियोजन आणि जागोजागी झटणारे स्वयंसेवकांचे हजारो हात या तीन दिवसीय इज्तेमाचे खास वैशिष्ट्ये ठरले आहे. राज्यातूनच नव्हे तर देशभरातून मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने दाखल होत असूनही कसल्याही प्रकारची गैरसोय दिसून आलेली नाही. येणार्या प्रत्येक भाविकाचे त्याठिकाणी एकमेकांकडून स्वागत होत आहे. सोलापूरसह कर्नाटकमधून येणार्या अनेक वाहनातील भाविकांना ठिकठिकाणी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आलेली आहे. इज्तेमास्थळी प्रत्येक नमाजनंतर लाखो हात एकाचवेळी दुवासाठी पुढे येत असून त्यातून सर्वांच्या ऐक्यासाठी आणि समस्त मानवजातीच्या कल्याणासाठी अल्लाहकडे प्रार्थना केली जात आहे.
Add new comment